मुंबई : गेल्या पाच वर्षांत देशातील दहा प्रमुख शहरांतील घरांच्या किमतीमध्ये सरासरी तब्बल ८८ टक्के वाढ झाल्याची माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या एका सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. सर्वेक्षणानुसार मुंबईतील घरांच्या किमतीमध्ये गेल्या पाच वर्षांत ३७ टक्के वाढ झाली होती.
२०१९ या वर्षी मुंबईत घरांचे सरासरी प्रति चौरस फूट दर हे २५ हजार ८२० रुपये इतके होते. तेच सरासरी दर २०२४ मध्ये ३५ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे या दहा शहरांच्या यादीत सर्वाधिक कमी दरवाढ ही मुंबई शहरांत नोंदली गेली आहे. मुंबईपेक्षा पुणे, नवी मुंबई, ठाणे येथे दरवाढ झाली आहे.
गुरगाव येथे सर्वाधिक वाढ या सर्वेक्षणानुसार देशात घरांच्या किमतीमध्ये सर्वाधिक वाढ ही गुरगाव येथे नोंदली गेली आहे. तेथील घरांच्या किमतींमध्ये तब्बल १६० टक्के वाढ झाली आहे. २०१९ मध्ये तेथील सरासरी दर हे ७५०० रुपये होते ते दर २०२४ मध्ये १९ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहेत.
... म्हणून मुंबईतील जागांना ‘भाव’- अन्य शहरांत नोएडा (१४६ टक्के), बंगळुरू (९८ टक्के), हैदराबाद (८१ टक्के), चेन्नई (८० टक्के), पुणे (७३ टक्के), नवी मुंबई (६९ टक्के), कोलकाता (६८ टक्के), ठाणे (६६ टक्के) आणि मुंबई (३७ टक्के) या प्रमाणे दरवाढ नोंदली गेली आहे. - या सर्वेक्षणाचे विश्लेषण करताना एका तज्ज्ञाने सांगितले की, इतर शहरांमध्ये दरवाढीची टक्केवारी जरी मोठी दिसत असली, तरी मुंबई शहराच्या तुलनेत तेथील किमती लक्षणीयरीत्या कमी आहेत. - मुंबईला भौगोलिक मर्यादा असल्यामुळे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईतील जागांच्या किमती या कायमच देशात सर्वाधिक राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यात किमान १० टक्के वाढ झाली, तरी त्याची पैशांतील किंमत जास्त आहे.