पर्यटनस्थळाजवळ टुमदार निवास? अर्ज भरा, पुरस्कार मिळेल झकास!
By स्नेहा मोरे | Published: December 5, 2023 06:50 PM2023-12-05T18:50:49+5:302023-12-05T18:53:09+5:30
ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - मागील काही वर्षांपासून पर्यटनाची व्याख्या बदलते आहे. घरापासून दूर राहून केवळ ऐशोआराम करणे यावर मर्यादित न राहता शहराच्या धकाधकीतून लांब जाऊन ग्रामीण पर्यटन अनुभवणे आणि तेथील राहणीमान, खाद्यसंस्कृती जाणून घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. हेच लक्षात घेऊन ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन गाव आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण घरगुती निवासाला पुरस्कार देण्याचे आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाला अर्ज पाठविण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
राज्यात सर्वाधिक ग्रामीण पर्यटनात रायगड, अलिबाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर , कर्जत ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणच्या निसर्गाच्या सानिध्यातील गावांतील घरगुती निवास सेवांना या स्पर्धेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तावर पोहोण्याची संधी मिळणार आहे. परिणामी, यामुळे पर्यटनाला अधिक प्रोत्साहन मिळेल, आणि पर्यटकांचा ओघ वाढेल हा पर्यटन विभागाचा उद्देश आहे. ग्रामीण पर्यटनात पर्यटकांचा अधिक कल अनुभवातून पर्यटनाकडे आहे. पर्यटकांना स्थानिक लोकसंस्कृती, खाद्यसंस्कृती , कला , राहणीमान जाणून घेण्याची अधिक इच्छा असते, त्यामुळे यातून पर्यटनाला नक्कीच बूस्ट मिळेल असे विभागाने म्हटले आहे.
अशी आहे पात्रता
अर्जदार हा जास्तीत जास्त २५ हजार लोकसंख्या असलेल्या गावाचा रहिवासी असावा. पर्यटन स्थळांच्या परिसरात गाव असावे. परिसरात उपक्रम-शेती, हस्तकला, लोकल खाद्यपदार्थ असावेत, अशा अटी आहेत. तर घरगुती निवास हे ग्रामीण भागात असावे. ग्रामीण घरगुती निवास कमीत कमी एक वर्षापासून कार्यान्वित असावे. ग्रामीण घरगुती निवास नोंदणीकृत असावे, अशा अटी आहेत.
अशी आहे अर्ज प्रक्रिया
गावांनी या नामांकनासाठी www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी www.rural.tourism.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन पर्यटन विभागाने केले आहे.