Join us  

झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

By admin | Published: December 05, 2015 9:08 AM

मुंबईसह ठाण्यातील झोपड्यांचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने झोपड्यांचा ‘डोअर टू डोअर बायोमेट्रिक अनेबल स्लम हटमेंट सर्व्हे’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मुंबईसह ठाण्यातील झोपड्यांचा पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने झोपड्यांचा ‘डोअर टू डोअर बायोमेट्रिक अनेबल स्लम हटमेंट सर्व्हे’ करण्याचा निर्णय घेतला आहे. एसआरएचे सर्व्हेअर घरोघरी जाऊन हा सर्व्हे करणार असून, त्यानंतर कुटुंबीयांना स्मार्ट कार्ड देण्यात येणार आहे. वर्षभरात झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण होणार असून, मुंबई-ठाण्यातील झोपड्यांची सद्य:स्थिती समोर येणार आहे. यामुळे एसआरए प्रकल्पांना गती मिळणार असल्याचे, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता यांनी सांगितले. या सर्वेक्षणाचा शुभारंभ शुक्रवारी जोगेश्वरी येथे पार पडला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.एसआरएने २0१४पर्यंतचे सॅटेलाइट मॅप विकत घेतले आहेत. त्यानुसार झोपडपट्टीची सीमा निश्चित करण्यात आली आहे. झोपड्यांची सीमा आखण्याचे सुमारे ७0 टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रायोगिक तत्त्वावर जोगेश्वरी येथील झोपड्यांचे सर्वेक्षण झाल्यावर पुढील काही दिवसांमध्ये मुंबई-ठाण्यातील झोपड्यांचा सर्व्हे करण्यात येईल, असेही गुप्ता म्हणाले.सर्वेक्षणावेळी झोपडीधारकाचे आधार कार्ड आणि अंगठ्याचे ठसे अशी माहिती घेण्यात येणार आहे. पण अनेक झोपडीधारकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांच्यासाठी झोपडपट्टीमध्ये आधार कार्डचे कॅम्प आयोजित करण्यात येतील, असेही गुप्ता यांनी सांगितले. अनेक योजनांचे परिशिष्ट २ तयार करण्यासाठी सुमारे २ वर्षे लागतात. परंतु या सर्वेक्षणामुळे एसआरएकडेही झोपड्यांची माहिती उपलब्ध होणार असल्याने याची प्रक्रिया तातडीने मार्गी लागणार असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला. सध्या सर्वेक्षणासाठी तीन टीम कार्यरत असून, जानेवारीपर्यंत त्यांची संख्या ५0पर्यंत करण्यात येणार आहे. ...तर ४ वर्षांत शहर झोपडपट्टीमुक्त एसआरए योजनांना अधिक गती देण्यासाठी या सर्व्हेचे काम एसआरएने हाती घेतले आहे. मुंबईकरांचे सहकार्य लाभल्यास येत्या ४ वर्षांत शहर झोपडपट्टीमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी या वेळी व्यक्त केला. म्हाडाकडे ७७ योजनांच्या परिशिष्ट २चे काम शिल्लक होते. परंतु म्हाडाने हे काम करण्यास नकार देत ते एसआरएकडे सुपुर्द केले आहे. त्यामुळे या योजनांच्या पुनर्विकासाला गती मिळेल, असे वायकर म्हणाले.धारावीतील झोपड्या सर्वेक्षणातून वगळल्याधारावीतील झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे धारावीच्या झोपड्यांचा सर्व्हे होणार नसल्याचे, गुप्ता यांनी या वेळी स्पष्ट केले. तसेच विमानतळ प्राधिकरणाच्या जमिनीवरील झोपड्यांचाही सर्व्हे करण्यात येणार नसल्याचे, त्यांनी सांगितले.