घराघरांत हवी होम लायब्ररी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 12:05 AM2018-12-08T00:05:35+5:302018-12-08T00:05:42+5:30
मानवी जीवनाच्या उत्क्रांतीबरोबरच ज्ञानाची साधने विकसित होत गेली.
- दाजी कोळेकर
मानवी जीवनाच्या उत्क्रांतीबरोबरच ज्ञानाची साधने विकसित होत गेली. विचार, भावना व मत यांची देवाणघेवाण करण्यासाठी तोंडी संवादानंतर छपाईचा शोध लागला आणि पुढे वेगवेगळ्या छपाई साहित्यांची निर्मिती होत गेली. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘पुस्तक’ अर्थात ‘ग्रंथ’. या पुस्तकांच्या संग्रहालयालाच लायब्ररी अर्थात ग्रंथालय असे म्हणतात. अशा लायब्ररी आता घरोघरी होत असून आता ‘होम लायब्ररी’ ही संकल्पना पुढे येत आहे.
पू र्वीची घरे आणि आताची घरे यामध्ये फरक असल्याचे दिसून येते. अलीकडची घरांची रचना, संकल्पना व निर्मिती यामध्ये मोठी आधुनिकता व वास्तुशास्त्राच्या पद्धतीनुसार साकारली जात असल्याचे दिसत आहे. मग त्यामध्ये समावेश होतो तो किचन, हॉल, बेडरूम, देवघर आणि अभ्यासिका यांचा. यातील अभ्यासिका म्हणजे गं्रथालय होय. अनेक ठिकाणी होम लायब्ररी ही संकल्पना उदयास येताना दिसत आहे. तसेच अलीकडे शिक्षणाचे प्रमाण वाढले असून वाचन संस्कृतीही विकसित होत चालली आहे. तसेच छपाईचा शोध लागल्यामुळे विविध विषयांची पुस्तके वाचण्याचा कल वाढत आहे.
छापील व हस्तलिखित माहिती एकत्र ठेवण्याचे ठिकाण म्हणजे ग्रंथालय होय. येथे ज्ञान व माहितीचे संग्रहण केलेले असते. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये ग्रंथालयांना मोठा इतिहास असून, प्राचीन भारतीय विद्यापीठ तक्षशीलेचे ग्रंथालय प्रसिद्ध असल्याच्या नोंदी मिळतात. असे असले तरी सध्या होम लायब्ररीची रचना व स्वरूप कसे असावे, हा महत्त्वाचा भाग आहे.
होम लायब्ररीमध्ये रचना करत असताना प्रथम आपल्याकडे असलेल्या पुस्तकांची यादी तयार करावी. ती लेखकानुसार बनवून त्यातील पुस्तकांना एक नंबर द्यावा आणि विषयानुसार पुस्तकांची मांडणी करावी. तसेच पुस्तके ठेवण्यासाठी शक्यतो घरातील जागेनुसार कपाटाचा वापर करावा. शक्यतो, कपाटातील ठेवलेल्या पुस्तकांचे नाव समोरून दिसेल अशा रीतीने ती ठेवावीत. म्हणजे शोधण्यासाठी वेळ लागणार नाही. तसेच वेळोवेळी पुस्तकांवरील धूळ झटकून ती स्वच्छ ठेवावी. घेतलेली पुस्तके वाचनादरम्यान पाने दुमडून ठेवू नयेत. इतरांना वाचावयास दिली तरी त्यांची नोंद ठेवून परत देण्यास सूचित करावे, जेणेकरून आपली होम लायब्ररी सुस्थितीत राहील.
होम लायब्ररी ही सध्याच्या काळात गरजेची असली तरी त्याची व्यवस्थाही नीटनेटकी ठेवणे आवश्यक आहे. कारण अशी ज्ञानाची भांडारे घराघरांत निर्माण होणे गरजेची आहेत, यामध्ये अनेक नियतकालिके, दैनिके व विविध विषयांतील पुस्तके, कथा-कादंबऱ्या विविध वयोगटांसाठी साहित्य ठेवणे गरजेचे आहे. घरातील प्रत्येकाच्या ज्ञानाची भूक भागणे आवश्यक असल्याने अलीकडे घराघरांत होम लायब्ररीचा ट्रेंड वाढत आहे.
>ग्रामीण भागात साकारलेय पुस्तकांचे घर
ग्रामीण भागात वाचन व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी सांगली जिल्ह्यातील साळशिंगे येथील रेवणसिद्ध कदम नावाच्या पदवीधर तरुणाने पुस्तकाचे घर उभारले आहे. यामध्ये शालेय पुस्तकांसह बालकथांपासून स्पर्धा परीक्षेची हजारभर पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. येथे दर रविवारी आठवड्यासाठी पुस्तके वाचवण्यास घरी दिली जातात. या उपक्रमासाठी घरच्यांनी युवकाला सहकार्य करत वाचन संस्कृती रुजविण्यासाठी कृतिशील पाऊल उचलले आहे.