‘होमी भाभा बालवैज्ञानिक’ची नोंदणी १ जुलैपासून
By admin | Published: June 19, 2017 03:18 AM2017-06-19T03:18:42+5:302017-06-19T03:18:42+5:30
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधन वृत्तीला चालना मिळावी, वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी म्हणून मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, संशोधन वृत्तीला चालना मिळावी, वैज्ञानिक दृष्टी विकसित व्हावी म्हणून मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे (एमएसटीए) डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात येते. इयत्ता सहावी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येत असून १ जुलैपासून या स्पर्धेची नोंदणी सुरू होणार असल्याचे मंडळातर्फे जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या ३७ वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा चार स्तरांवर घेण्यात येते. लेखी, प्रात्यक्षिक, कृती संशोधन प्रकल्प आणि मुलाखत या स्तरांवर जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक देऊन गौरविण्यात येते.
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या (बालभारती) पुस्तकांवर लेखी आणि प्रात्यक्षिक चाचणी घेतली जाते. ज्या शाळेतून सर्वाधिक विद्यार्थी या
स्पर्धेत सहभागी होतील, त्या शाळेला विशेष चषक देण्यात येतो. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील इयत्ता सहावी आणि नववीच्या राज्य
बोर्डाच्या विद्यार्थ्यांसह
सीबीएसई आणि आयसीएसईचे विद्यार्थीही यात सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेसाठी आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना बालभारती पुस्तकांचा अभ्यास करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टी विकसित करणे, पर्यावरणरक्षणाचे महत्त्व रुजवणे या दृष्टीने ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असल्याचे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.