क्लस्टर विद्यापीठाला होमी भाभांचे नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:47 AM2018-08-11T04:47:10+5:302018-08-11T04:47:23+5:30
मुंबईत कुलाबा येथे रुसा अंतर्गत प्रथमच एका क्लस्टर विद्यापीठाची स्थापना होणार आहे.
मुंबई : मुंबईत कुलाबा येथे रुसा अंतर्गत प्रथमच एका क्लस्टर विद्यापीठाची स्थापना होणार आहे. यासाठी ५५ कोटींचा निधी मंजूर झाला असून यामध्ये इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स सिडनहॅम, एल्फिन्स्टन, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश करण्यात आला आहे. या समूह विद्यापीठाला ‘डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठ’ असे नाव देण्यात येणार आहे. सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये या नवीन विद्यापीठाशी संलग्न होऊ शकतात. भविष्यात १०० महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रुसाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत महाराष्ट्र राज्याचा समूह विद्यापीठाचा सुधारित प्रस्ताव मान्य करण्यात आला. या समूह विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स हे अग्रणी महाविद्यालय असेल. इतर सहभागी महाविद्यालयांत सिडनहॅम महाविद्यालय, एल्फिन्स्टन महाविद्यालय, शासकीय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा समावेश करण्यात येईल. यासाठी केंद्र सरकारकडून ५५ कोटींचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. विज्ञान आणि संशोधनासाठी योगदान दिलेली कुलाबा येथील इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स ही संस्था या क्लस्टरचे मुख्य काम पाहणार आहे.
क्लस्टर विद्यापीठात कार्यरत प्राध्यापकांचे अनुदान शासनामार्फतच देण्यात येईल. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत अधिक सुधारणा होईल; तसेच त्यांना अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होऊ शकेल.
>क्लस्टर विद्यापीठ म्हणजे काय?
राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान (रुसा) हे उच्च शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता सुधारणेसाठी केंद्र शासनाने आखलेले अभियान आहे. क्लस्टर विद्यापीठे ही त्यामधील एक योजना आहे. याअंतर्गत महाविद्यालयांचे गट करून त्यांना काही प्रमाणात शैक्षणिक स्वायत्तता आणि आर्थिक पाठबळ देण्यात येते. महाविद्यालयांना मिळणारा निधी आणि मिळणारे स्वातंत्र्य यामुळे नवे अभ्यासक्रम तयार करणे, संशोधनासाठी प्रकल्पांवर एकत्रित काम करणे, वेगळ्या विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे शक्य होते.