मुंबई - नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील एका शेतकरी पुत्राने पोलिसाच्या इमानदारीचा किस्सा आपल्या फेसबुकवरुन शेअर केला आहे. पोलिसांबद्दल समाजात मोठ्या प्रमाणात नकारात्म भावना आहे. त्यातली त्यात ट्रॅफिक पोलिसांबद्दल अधिकच. मात्र, सावनेर पंचायत समिती विभागातील नरेंद्र सूर्यवंशी यांना वेगळाच अनुभव आला. त्यामुळे, जय हिंद म्हणत नरेंद्र यांनी पोलिसांच्या प्रामाणिकतेला सलाम केला.
जिल्हा परिषद निवडणुका असल्याने तहसिलची पार्कींग नरेंद्र यांच्या कार्यालयासमोर होती. त्यामुळे निवडणुकीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची अन् पोलिसांचीही पार्कींग याच कार्यालयाजवळ करण्यात आली होती. संध्याकाळी नरेंद्र जेव्हा आपल्या ऑफिसवरुन घरी निघाले, त्यावेळी त्यांच्या गाडीचे इंडिकेटर तुटल्याचं त्यांना दिसून आलं. इंडिकेटर तुटल्याचं पाहून नरेंद्र यांनी मनातील मनात शिव्या दिल्या, हे कुणी केलं असा प्रश्न त्यांना पडला. बाजुलाच असलेल्या पवन नावाच्या त्यांच्या मित्राने घडलेली घटना त्यांना सांगितली.तुमच्या गाडीला एका पोलिसवाल्याच्या गाडीचा धक्का लागला होता. त्यावेळी, गाडीचे इंडिकेटर तुटले. तुम्हाला इंडिकेटरचे पैसे देण्यासाठी तो पोलिसवाला आजू-बाजुला पाहत होता. पण, बहुतेक तुम्ही जेवण करायला गेले असाल, असे पवनने सांगितले.
पवनची स्टोरी ऐकल्यानंतर नेरंद्र यांनी पोलिसाला पुन्हा मनात शिव्या देत गाडी गॅरेजकडे नेली. त्यावेळी, नवीन इंडिकेटर काढण्यासाठी गाडीचे तुटलेले इंडिकेटर काढले अन् नरेंद्र यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण, ज्या पोलिसाकडून गाडी पडली होती, त्या पोलिसाने इंडिकेटरच्या आतमध्ये एका कागदात चाळीस रूपये कागदात गुंडाळून ठेवले होते. त्या पोलीसवाल्या व्यक्तीला गाडीमालक दिसला नाही, म्हणून त्यांनी ही नुकसान भरपाई ठेवली होती. एका पोलिसाची ही इमानदारी अनुभवल्यानंतर नरेंद्र यांनी तात्काळ त्या पोलिसाला सॅल्यूट ठोकला. तसेच, सर किंमत त्या पैशाची नाही, आपण दाखवलेल्या त्या ईमानदारीची आणि वर्दी चढवतांना घेतलेल्या शपथेची होती. तुम्ही तुमचा नंबर द्यायला हवा होता, जर तुम्हाला हा मेसेज मिळाला तर मनापासून धन्यवाद, असे नरेंद्र यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन लिहिले. शेवटी, सच्चा पोलिसवाला, जय हिंद! सर... असेही नरेंद्र यांनी म्हटले.
नरेंद्र यांची फेसबुक पोस्ट