‘प्रामाणिकपणा व कष्ट म्हणजे आयुष्य’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:10 AM2017-08-01T03:10:37+5:302017-08-01T03:10:37+5:30
साहित्य सहवासमधील लोकांनी आमच्या कुटुंबाला आपलेसे केले. या सहवासातूनच प्रामाणिकपणा, कष्ट हेच खरे आयुष्य असल्याचे कळून चुकले.
मुंबई : साहित्य सहवासमधील लोकांनी आमच्या कुटुंबाला आपलेसे केले. या सहवासातूनच प्रामाणिकपणा, कष्ट हेच खरे आयुष्य असल्याचे कळून चुकले. या गुणांमधील आनंद शोधताना साहित्य सहवासातील दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरले. त्यातून आयुष्य अधिक प्रगल्भ झाल्याचे मत लेखक सिद्धार्थ पारधे यांनी व्यक्त केले. डोंबिवली येथील ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’तर्फे ‘कॉलनी आणि कॉलनीनंतरचा मी’ या मुलाखतीत पारधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डोंबिवली फ्रेंड्स कट्टा कार्यक्रमात पारधे यांनी कॉलनीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. विजया राजाध्यक्ष, विं.दा. करंदीकर, अनंत काणेकर, व.पु. काळे आणि साहित्य सहवासातील ७४ कुटुंबांतील आठवणींमुळे तब्बल दीड तास पारधे यांची मुलाखत रंगली. कॉलनी पुस्तकाने खूप काही दिले आहे, याबाबत पारधे यांनी समाधान व्यक्त केले. कॉलनीमध्ये आई-वडिलांनी कॉलनी उभारण्यासाठी कष्ट केले; त्या कॉलनीत स्वकष्टाने जागा घेणे या प्रवासाचे वर्णन शब्दबद्ध केले आहे. कॉलनीच्या वाचकांचा अनुभवदेखील मौल्यवान असल्याचे कौतुकोद्गार पारधे यांनी काढले. सतीश चाफेकर आणि प्रभाकर भिडे यांनी पारधे यांची मुलाखत घेतली.