मुंबईकरांच्या प्रामाणिकपणावर मोहोर; पैशांनी भरलेली पाकीटे केली परत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 05:46 AM2021-09-17T05:46:33+5:302021-09-17T05:47:07+5:30
जगात पटकाविला दुसरा क्रमांक; पहिल्या क्रमांकावर हेलसिंकी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :मुंबईकरांच्या प्रामाणिकपणाचे दाखले जागतिक पातळीवर सातत्याने दिले असतानाच आता पैशांनी भरलेले पाकीट परत केल्याने जागतिक पातळीवरील आणखी एका अहवालात मुंबईकरांच्या प्रामाणिकपणाची नोंद दुसऱ्या स्थानी करण्यात आली आहे. तर पहिल्या स्थानी फिनलँडमधील हेलसिंकी हे शहर असून सगळ्यात खाली पोर्तुगालमधील लिस्बन हे शहर आहे.
रीडर्स डायजेस्टने कोणती शहरे किती प्रामाणिक आहेत? हे तपासण्यासाठी जागतिक स्तरावर एक छोटा प्रयोग केला. दि वॉलेट एक्सप्रिमेंट या नावाने करण्यात आलेल्या प्रयोगात जगातील मोठ्या सोळा शहरांची निवड करण्यात आली. या सोळा शहरांत एकूण १९२ पैशांची पाकिटे जाणूनबुजून गहाळ करण्यात आली. प्रत्येक शहरात बारा पैशांची पाकिटे गहाळ करण्यात आली. प्रत्येक पैशाच्या पाकिटात एका व्यक्तीचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि फोटो देखील होता. शिवाय कूपन, बिझनेस कार्ड आणि ३ हजार ६०० रुपये देखील होते. अशी पैशाची पाकिटे गहाळ केल्यानंतर आता यातील किती पैशांची पाकिटे परत येतात? याची वाट पाहिली गेली.
सामाजिक प्रयोग म्हणून ओळखल्या गेलेल्या या प्रयोगात मुंबईसारख्या मायानगरीत बारापैकी तब्बल नऊ पैशांची पाकिटे प्रामाणिकपणे परत आली. अशा रितीने मुंबईकरांच्या प्रामाणिकपणावर पुन्हा एकदा मोहोर उमटविली गेली. या प्रयोगात मुंबईला दुसरे स्थान मिळाले. तर फिनलँडमधील हेलसिंकी शहरात बारा पैकी अकरा पैशांची पाकिटे परत आली.
अशारितीने हेलसिंकी या शहराचे स्थान एक नंबर राहिले. याच यादीत न्यूयॉर्क आणि बुडापेस्ट बारापैकी आठ, मॉस्को आणि ॲम्स्टडरममध्ये सात, बर्लिन आणि ल्युबलियानामध्ये सहा, लंडन आणि वर्सायमध्ये पाच पैशांची पाकिटे परत आली. तर पोर्तुगालमधील लिस्बन शहरात बारापैकी केवळ एक पैशाचे पाकीट परत आले. अशा रितीने या शहराचे स्थान सर्वात शेवटचे नोंदविण्यात आले. दुसरीकडे ब्राझीलमधील रियो दी जिनेरियो, स्वीर्झलँडमधील ज्युरिख, रोमानियामधील बुकारेस्टमध्ये बारा पैकी चार, चेक रिपब्लिकमधील प्राग येथे तीन, स्पेनमधील मद्रीदमध्ये दोन पैशांची पाकिटे परत आली.
- उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुंबईच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले आहे. तशी प्रतिक्रिया आनंद महिंद्रा यांनी समाज माध्यमावर नोंदविली असून, या प्रयोगानंतर हाती आलेल्या निकालानंतर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय या प्रयोगातील नागरिकांच्या दृष्टिकोनातून मुंबईकडे पाहिले तर निश्चितच मुंबईकरांचा अभिमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.