Join us  

गोडासोबत तिखट मोदकांच्याही पाककृती

By admin | Published: September 09, 2016 3:32 AM

बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांमध्ये विविधता आणत, गोडासोबत तिखट मोदकाच्या हटके पाककृतींचे सादरीकरण केले

मुंबई : बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांमध्ये विविधता आणत, गोडासोबत तिखट मोदकाच्या हटके पाककृतींचे सादरीकरण केले आणि मुलांच्या विविध खेळांमध्ये सहभागी होत लहानग्यांनीही धम्माल मस्ती केली. अशा जोशपूर्ण वातावरणात ‘आपले बाप्पा २०१६’ला सुरुवात झाली.‘लोकमत’, संस्कृती दर्पण प्रतिष्ठान आणि शुभविधी डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने, ६ ते १३ सप्टेंबर या कालावधीत ‘आपले बाप्पा २०१६’ या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यातील मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला पहिला उपक्रम दादर (पूर्व) येथील गुरुदत्त मित्र मंडळात पार पडला. या वेळी मुलांसाठी संगीत खुर्चीसारख्या मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यात सहभागी होत मुलांनी धम्माल केली आणि भरघोस बक्षिसे जिंकली. तर महिलांच्या पाककृतीची कसोटी लावणारी मोदक स्पर्धा दादर पूर्व येथील अंकुर मित्र मंडळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी महिलांनी पारंपरिक गोड मोदकांसोबत तिखट मोदकांच्या पाककृती सादर करीत परीक्षकांना खूश केले. या स्पर्धेत संचिता पाटील (प्रथम), अश्विनी बावकर (द्वितीय), सुजाता पाटील (तृतीय), कामिनी घाडगे (उत्तेजनार्थ) आणि सुनीता हिरे (उत्तेजनार्थ) अशी बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण मनीषा सोलंकी यांनी केले. 

‘आपले बाप्पा २०१६’ या कार्यक्रमासाठी संस्कृती दर्पण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय दास्ताने आणि सचिव श्वेता सरवणकर यांचे सहकार्य लाभले आहे. यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून इकोफ्रेंडली गणेशमूर्तीसह सजावट स्पर्धा, इकोफ्रेंडली गणेश मंडळ स्पर्धा आणि सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश सजावट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धकांनी बाप्पाच्या सजावटीचे फोटो, नाव, पत्त्यासह  contact@shubhvidhi.com  या मेल आयडीवर पाठवून द्यावेत, अथवा अधिक माहितीसाठी मनीषा सोलंकी - ९८१९२६०८८९ आणि प्रीती नायडू - ९१६७४०४२६१ यांच्याशी संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा.