मुंबई पोलिसांच्या शौर्याचा सन्मान; नऊ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 07:02 AM2019-08-15T07:02:54+5:302019-08-15T07:03:16+5:30

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे पोलिसांच्या शौर्यासाठी एकूण ९४६ राष्ट्रपती पदके बुधवारी जाहीर करण्यात आली.

 Honor of the bravery of Mumbai police; Nine people have been awarded the President's Medal of Honor | मुंबई पोलिसांच्या शौर्याचा सन्मान; नऊ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

मुंबई पोलिसांच्या शौर्याचा सन्मान; नऊ जणांना राष्ट्रपती पदक जाहीर

Next

मुंबई : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे पोलिसांच्या शौर्यासाठी एकूण ९४६ राष्ट्रपती पदके बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यात मुंबई पोलीस दलातील ९ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या काही पोलिसांच्या कारकिर्दीवर टाकलेला प्रकाशझोत.

जणू स्वप्नच पूर्ण झाले
डोंगरी विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनाही राष्टÑपती पदक जाहीर झाले आहे. सोलापूरच्या शांगोला जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. वडील रेल्वे स्टेशन मास्तर. महाविद्यालयील शिक्षण सुरू असताना मित्राने एमपीएससी परीक्षा देण्याचा आग्रह केला. अखेरच्या दिवशी अर्ज भरला. परीक्षा दिली आणि ते पासही झाले. मित्र मात्र नापास झाला. अपघातानेच ते पोलीस खात्यात दाखल झाले. मात्र परीक्षा देण्याचा निर्णय योग्य होता, हे पोलीस खात्यात काम करताना जाणवले, असे त्यांनी अभिमानाने सांगितले. १९८८ साली नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांनी पुढील प्रशिक्षण पूर्ण केले. दहिसर हे त्यांचे सर्वप्रथम कर्तव्यात रुजू होण्याचे पहिले पोलीस ठाणे होते. येथे १९८८ ते १९९१ पर्यंत ते कार्यरत होते. ३१ वर्षांतील पोलीस सेवेतील १७ वर्षे त्यांनी गुन्हे शाखेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. रामनाथ हत्याकांड, जेएनपीटी येथील छोटा राजन शस्त्रसाठा प्रकरण, १३ एन्काउंटरसह १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटासह रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. यापूर्वी त्यांना विशेष पोलीस, पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यात राष्ट्रपती पदक मिळावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. तेच स्वप्न आज पूर्ण झाल्याने शब्दांत भावना व्यक्त करणे कठीण असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

- अविनाश धर्माधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंगरी


अधिकाधिक उत्कृष्ट कामगिरीचा प्रयत्न
अहमदनगरचे रहिवासी असलेले अब्दुल राउफ शेख यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईतच झाले. त्यांचे वडीलही पोलीस खात्यात असल्याने खाकी वर्दीबाबत लहानपणापासूनच त्यांना प्रेम होते. १९८९ मध्ये ते पोलीस खात्यात रुजू झाले. त्यानंतर स्पेशल आॅपरेशन ब्रांचमध्ये काम करणाºया शेख यांच्या नावे मुंबईतील गँगस्टरचा कणा मोडणाºया १० ते १५ एन्काउंटरची नोंद आहे. १९९६ साली दगडी चाळीत झालेले एन्काउंटर हे दिवसाढवळ्या झालेले पहिले एन्काउंटर होते. यात दोन कुख्यात गुंडांना कंठस्नान घालत शेख यांनी १९९६ चे शौर्यपदक पटकाविले होते. साडेतीनशेहून अधिक पोलीस आयुक्त रिवार्ड शेख यांना अद्यापच्या कारकिर्दीत मिळाले असून त्यात बेस्ट डिटेक्शनचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येक ठिकाणी उल्लेखनीय कार्य करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत २००० साली त्यांना पोलीस महासंचालक पदकानेही सन्मानित करण्यात आले होते. राष्टÑपदी पदक जाहीर झाल्याने आता जबाबदारी आणखी वाढली आहे. पुढे अशाच प्रकारे जास्तीतजास्त उत्कृष्ट कामगिरी करत राहण्याचा मानस असल्याचे शेख यांनी सांगितले.

- अब्दुल रौफगणी शेख, सहायक पोलीस निरीक्षक, साकीनाका पोलीस ठाणे


जबाबदारी पार पाडणे महत्त्वाचे
रत्नागिरीच्या आकुर्डे गावी मिलिंद खेतले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भिकाजी खेतले हेदेखील पोलीस खात्यातच कार्यरत होते. त्यांनाही गुणवत्ता पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. आकुर्डेच्या प्राथमिक शाळेत त्यांनी इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर घाटकोपर पंतनगरमधील शिवाजी शिक्षण संस्थेच्या टेक्निकल शाखेतून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. १९८७ साली ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाले. दोन महिन्यांसाठी ते एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते; मात्र अ‍ॅण्टॉप हिल हेच त्यांचे पहिले पोलीस ठाणे असल्याचे ते सांगतात. तत्कालीन पोलीस उपायुक्त मीरा बोरवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे करिअर घडले. वनराईत २०१७ साली बॉम्बे एक्झिबिशन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या हिरे प्रदर्शनात लाखोंचे हिरे चोरी करून पळण्याच्या तयारीत असलेल्या दोन चायनीज नागरिकांना अत्यंत शिताफीने खेतले यांनी अटक केली होती. असे अनेक गुन्हे त्यांनी उघडकीस आणले. राष्ट्रपतींचे १९९७ आणि २००७ सालचे शौर्य आणि गुणवत्ता पुरस्काराचा मान खेतले यांनी पटकावला असून १५ आॅगस्ट, २०१९ च्या उल्लेखनीय कार्य पुरस्काराचेही ते मानकरी ठरले आहेत. कोणतेही रागरुसवे न ठेवता समोर येणारी जबाबदारी नेहमी पार पाडून सहकाऱ्यांप्रति नेहमी सहकार्याची भावना ठेवण्याचा संदेश खेतले यांनी दिला आहे.

- मिलिंद खेतले, सहाय्यक पोलीस आयुक्त, साकीनाका विभाग

राष्टÑपदी पदक मिळाल्याचा अभिमान
राज्य दहशतवाद विरोधी पथकातील पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनाही राष्टÑपती पदक जाहीर झाले. त्यांचे वडील सैन्य दलात होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनीही देशसेवेचा चंग बांधला. साताराच्या सैनिक शाळेतून या प्रवासाला सुरुवात झाली. ते १९९८ ला पोलीस दलात रुजू झालेले आयपीएस अधिकारी आहेत. नाशिकपासून त्यांनी धडाकेबाज कामगिरी सुरू केली. सध्या ते राज्य दहशतवाद विरोधी पथकात पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. राष्टÑपती पदक जाहीर झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी २०१३ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले. संवेदनशील ठिकाणी त्यांनी उत्तम काम केल्याने त्यांच्यावर अशा ठिकाणांची जबाबदारी सोपविण्यात येते.

- विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त राज्य दहशतवाद विरोधी पथक

पदक मिळाल्याचा आनंद
गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त नेताजी भोपळे यांचा जन्म सोलापूरच्या शेतकरी कुटुंबात झाला. १९८८-८९ मध्ये प्रशिक्षण घेत, ते पोलीस दलात रुजू झाले. वाकोला पोलीस ठाण्यात पीएसआय म्हणून सुरुवात करत पुढे त्यांची बीडीडीएसमध्ये नियुक्ती झाली. मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोटावेळी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बॉम्बशी निगडीत विविध गुन्ह्यांचा तपास केला. याच दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून ५ हजारांचे पारितोषिकही मिळाले होते. राष्टÑपती पदकाबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.

- नेताजी भोपळे, सहाय्यक पोलीस आयुक्त,
गुन्हे शाखा

Web Title:  Honor of the bravery of Mumbai police; Nine people have been awarded the President's Medal of Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस