जन्मशताब्दीनिमित्त इंदिरा गांधी यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 06:09 AM2017-11-20T06:09:43+5:302017-11-20T06:10:03+5:30
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय एकत्मता दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. मुख्य सचिव सुमित मल्लिक, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय, अवर सचिव महेश वाव्हळ यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
मुंबई काँग्रेसच्या वतीने आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. या वेळी मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधू चव्हाण, भवरसिंग राजपुरोहित यांच्या मुंबई काँग्रेसचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. डी. एन. नगर, अंधेरी येथे उत्तर पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी सभारंभानिमित्त ‘माँ तुझे सलाम’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका प्रियदर्शन, माजी आमदार बाबा सिद्दिकी, सुधा जोशी, गणेश यादव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय उपस्थित होता.
इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोशल मीडियावरही त्यांना आदरांजली वाहण्यात आली. प्रदेश काँग्रेस व मुंबई काँग्रेसने ‘इंदिरा१००’ या हॅशटॅगच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा दिला. तुळजापूर भेटीदरम्यान आई तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतानाच्या इंदिरा गांधी, नऊवारी साडी घातलेल्या इंदिरा गांधी, राज्यातील आदिवासी महिलांसोबत फेर धरणाºया इंदिरा गांधी... अशा आठवणींतील छायाचित्रांच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली.
>ठाण्यात ‘राष्टÑीय एकात्मतेची शपथ’
ठाणे : माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ठाणे शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये इंदिरा गांधी यांना अभिवादन करून, अधिकारी व कर्मचाºयांनी राष्टÑीय एकात्मतेची शपथ घेतली.
ठाणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्वागत कक्षात अधिकारी, कर्मचाºयांनी एकत्र येऊन इंदिरा गांधी यांना अभिवादन केले. या वेळी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांनी इंदिराजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या वेळी नायब तहसीलदार वारे यांच्यासह शासकीय वाहनचालक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी काही सेवानिवृत्त झालेल्या वाहनचालकांचा निरोप समारंभही पार पडला.
ठाणे शहरासह कल्याण, मीरा रोड उल्हासनगर या ठिकाणीही इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.