नागपूर : राज्यात लॉकडाऊनची घोषणा २३ मार्चला झाली. पण नागपूर शहरात मात्र १९ मार्चपासून दुकाने बंद आहेत. सरकारच्या घोषणेपूर्वीच नागपूरचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुरुवातीचे तीन दिवस सलून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. मात्र जवळपास ८१ दिवसांपासून व्यवसाय बंद असल्याने सलून दुकानदार आणि कारागिरांच्या डोळ्यात पाणी आले आहे. शासनाच्या आदेशाचा सन्मान, पण भुकेचे काय?, असा प्रश्न सलून व्यावसायिक करत आहेत.
सलून व्यावसायिकांचे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. नागपूर शहरासह जिल्हाभरातील सुमारे १७ ते २० हजार सलून दुकानदारांची अवस्था लॉकडाऊनमुळे वाईट झाली आहे. दुकानात काम करणाऱ्यांचाही रोजगार गेला आहे. अनेकांनी कर्जाऊ रक्कम घेऊन दुकान थाटले आहे. एका दुकानात सुमारे दोन ते पाच कारागीर कामाला असतात. भूक आणि भविष्याच्या चिंतेने आंदोलनाचे शस्त्र उपसून गेल्या चार दिवसांपासून दुकानदार आणि कारागीर वर्ग रस्त्यावर उतरला आहे.या आहेत मागण्या1सरकारने सलून व्यवसायाला सूट देऊन व्यवसायास परवानगी द्यावी.2प्रत्येक कारागीर व दुकानदारांना लॉकडाऊन काळात १० ते १५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी.3दुकानदारांना २५ ते ५० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य द्यावे.4दुकानदार व कारागिरांचा ५० हजार रुपयांचा विमा उतरविला जावा.5सुरक्षित व्यवसाय करण्यासाठी सरकारने पीपीई किट आणि अन्य साधने पुरवावी.6लॉकडाऊन काळातील दुकानभाडे आणि वीज बिल माफ करावे.