मुळ्येकाकांच्या संकल्पनेतून गुणवंतांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 07:46 PM2019-02-07T19:46:29+5:302019-02-07T19:46:45+5:30
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पनेतून साकारलेला ‘माझा पुरस्कार 2019’ चा सन्मान सोहळा येत्या बुधवारी 13 फेब्रुवारीला रंगणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात सायं.7.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्येंच्या संकल्पनेतून साकारलेला ‘माझा पुरस्कार 2019’ चा सन्मान सोहळा येत्या बुधवारी 13 फेब्रुवारीला रंगणार आहे. दादरच्या शिवाजी मंदिरात सायं.7.30 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल. मुळ्येकाकांच्या भन्नाट आयडियामधून सुरु झालेल्या या पुरस्कार सोहळ्याची क्रेझ प्रत्येक वर्षी वाढतेय. या पुरस्कार विजेत्यांची निवड मुळ्येकाकांची एक सदस्यीय समिती करत असते.
यंदा विनोदी नाटकासाठीचा पुरस्कार प्रशांत दामलेच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या नाटकाला जाहीर झालाय. तर याच नाटकासाठी अतुल तोडणकरला विनोदी अभिनेत्याचा तर प्रतीक्षा शिवणकरला विनोदी अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे. खास बाब म्हणजे प्रतीक्षाचं हे रंगभूमीवरचं पदार्पणातलं नाटक.
नाट्यलेखन आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘डियर आजो’साठी मयुरी देशमुखला तर सहाय्यक अभिनेता म्हणून सतीश राजवाडेचा सन्मान ‘अ परफेक्ट मर्डर’साठी होणार आहे. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे यांना विशेष माझा पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या मालिकेने 400 भागांचा टप्पा पार केलाय.
आरती कदम यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. वैचारिक, सांस्कृतिक, मनोरंजनपर आदी विविधांगी विषयांचा मेळ साधणारी चतुरंग ही पुरवणी म्हणजे सर्वांना तृप्त करणारी द्रौपदीची थाळीच जणू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता संजय मोने आपल्या खास शैलीत करणार आहेत. नेपथ्य सुनील देवळेकर यांचं तर प्रकाशयोजना शीतल तळपदेंची असणार आहे. ध्वनीसंयोजन विराज भोसलेंचं असणार आहे. कला, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.
पुरस्कार सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे 14 तारखेच्या व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी हा कार्यक्रम होतोय. त्यामुळे ‘गाणी गोड प्रेमाची....’ या संकल्पनेवर आधारित हिंदी-मराठी प्रेमगीते सादर करत मधुर स्वरांनी एक दिवस आधीच हा प्रेमदिन साजरा होणार आहे.
नीलिमा गोखले, जयंत पिंगुळकर, ऋषिकेश अभ्यंकर, अद्वैता लोणकर, केतकी भावे-जोशी हे नामवंत गायक कलाकार ही गीते सादर करणार आहेत, तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचं आहे. या सोहळ्यासाठी कोणतेही प्रायोजक नसून मुळयेकाकांच्या मित्रपरिवाराकडूनच याचा आर्थिक भार उचलला जातो. हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. रसिकांसाठी मोजक्याच विनामूल्य प्रवेशिका शनिवार दि. 9 पासून नाट्यगृहावर सकाळी 8.30 ते 11, सायंकाळी 5 ते 8 या वेळेत मिळतील.