लीनल गावडे , मुंबईमुंबई : लोकांनी संघटित व्हावे, म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे पारंपरिक स्वरूप अजूनही भांडुप येथील विकास मंडळाने जपले आहे. शिवाय सामाजिकतेचे भान राखत ‘मान टिळकांचा, ठसा सामाजिक बांधिलकीचा’ या ब्रीदवाक्याप्रमाणे मंडळ गेली ४७ वर्षे काम करत आहे.भांडुप पश्चिम येथील विकास मंडळाची स्थापना १९७० साली झाली. मंडळाच्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. अगदी स्थापना काळापासूनच अनेक सामाजिक कामांमध्ये मंडळाने पुढाकार घेतला. पारंपरिक पद्धतीने हे मंडळ गेली कित्येक वर्षे गणेशोत्सव साजरा करत आहे. कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दखल घेत मंडळ काम करते. डीजे, लाऊडस्पीकर, फटाके या मंडळाने आवर्जून टाळले आहेत. बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनावेळी पारंपरिक दिंडी काढली जाते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आगमन आणि विसर्जन सोहळा पार पाडला जातो. या वेळी आवर्जून पारंपरिक वाद्यांचाच उपयोग मंडळ करते. त्यामुळे बाप्पाचा हा थाट बघण्यासाठी लोकांची गर्दी असते. यंदा मंडळाने ‘स्वराज्य मिळाले, सुराज्य कधी?’ या विषयावर यंदाचा चलचित्र देखावा तयार केला असून तो अनेकांना वेगळी दृष्टी देईल, असा आत्मविश्वास मंडळाने व्यक्त केला आहे. सामाजिक कार्यसामाजिक कार्यासाठी मंडळातील तरुण तत्पर असतात. मंडळाच्या माध्यमातून समाजासाठी काय करता येईल, याचा दरवर्षी मंडळ विचार करते. मंडळाने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी गाव दत्तक घेतले असून तेथील मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी बालवाडी उभारली आहे. शिवाय तेथील नागरिकांच्या दैनंदिन समस्यादेखील मंडळाने सोडविल्या आहेत. गरजू व होतकरू विद्यार्थी दत्तक योजना, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, भूकंपग्रस्तांना मदत, कुपोषितग्रस्तांना धान्यवाटप, अनाथाश्रमाला मदत केली जाते. विशेष म्हणजे मंडळाने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वतंत्र जंतुनाशक फवारणी यंत्र खरेदी केले असून परिसरात नित्यनेमाने फवारणी केली जाते. नुकतीच मंडळाने विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका बांधली असून या गणेशोत्सवादरम्यान त्याचे अनावरण करण्यात येणार आहे.विविध उपक्रमगणेशोत्सवाच्या काळात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आरोग्य शिबिर, करिअर मार्गदर्शन शिबिरांचे या वेळी आयोजन करण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे बौद्धिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठीही विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.
मान टिळकांचा, ठसा सामाजिक बांधिलकीचा
By admin | Published: August 30, 2016 3:11 AM