Join us

‘स्त्रीशक्तीचा सन्मान करुया, एक संवेदनशील नागरिक बनुया’

By admin | Published: October 03, 2016 4:23 PM

राजभवन वाळकेश्वर येथील श्रमिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3-  राजभवन वाळकेश्वर येथील श्रमिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्री उत्सवाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा संदेश दिला आहे.
 
दिल्ली, खैरलांजी, कोपर्डी या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, स्त्रियांवरील अत्याचार बंद व्हावेत, हुंड्यासाठी होणारा स्त्रियांचा छळ थांबावा, मुलामुलींच्या शिक्षणात भेदभाव होऊ नये, नवऱ्याकडून होणारी मारहाण थांबावी, बाललैंगिक शोषण थांबावे, कामकाजाच्या ठिकाणी महिलांचे शोषण होऊ नये असे आवाहन समर्पक चित्रांच्या माध्यमातून करीत असतानाच ‘स्त्रीशक्तीचा सन्मान करुया, एक संवेदनशील नागरिक बनुया’ असा संदेश मंडळाने दिला आहे. हे संदेश सर्व सामान्य नागरिकांना समजावे या दृष्टीने सोप्या परंतु प्रभावी भाषेत दिले आहेत. 
 
त्यासोबतच मंडळाने पी व्ही सिंधू, कल्पना चावला, इनाम गंभीर (परराष्ट्र सेवा), आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले यांचे उत्तुंग कार्य देखील चित्रांच्या माध्यमातून दाखविले आहे.
 
राज्यपाल भेट देणार-
 
आपल्या स्थापनेचे ५५ वे वर्ष साजरे करणाऱ्या मंडळाच्या नवरात्रोत्सव मंडळाला राजभवन परिवाराचे प्रमुख या नात्याने राज्यपाल श्री चे विद्यासागर राव पत्नी श्रीमती विनोदा यांसह भेट देणार आहेत. यंदा महिला व मुलांसाठी विविध उपक्रम घेण्याचे ठरविले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दिवानसिंग पाटील यांनी सांगितले.