वृद्ध साहित्यिक आणि कलावंतांचे मानधन नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:07 AM2021-02-15T04:07:32+5:302021-02-15T04:07:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. मोठे कार्यक्रम तसेच नाट्यगृह व सिनेमागृह बंद असल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. मोठे कार्यक्रम तसेच नाट्यगृह व सिनेमागृह बंद असल्याने अनेक साहित्यिक व कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दर महिन्याला मानधन देण्यात येते. मात्र हे मानधन २०२०च्या नोव्हेंबरपासून थकीत असल्याने अनेक साहित्यिक व कलावंतांच्या अडचणी वाढल्या आहेत.
सरकार आधीच आम्हाला अत्यंत तुटपुंजे मानधन देत आहे. ते मानधनदेखील वेळेवर आले नाही तर आम्ही म्हातारपणातले दिवस कसे काढायचे, असा सवाल कलावंतांकडून उपस्थित होत आहे. तमाशा कलावंत, भारुड, भजनी मंडळ, जंगी तुरा कवाली, लावणी व वादक अशा कलाकारांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे कलावंतांचे म्हणणे आहे. अनेक कलावंतांना राहण्यास स्वतःचे घर नाही त्यात घरात कुणी कमावता व्यक्ती नसल्याने ते हाताला मिळेल ते काम करीत आहेत. अनेक कलावंत अपंग तसेच आजारपणाने ग्रासले असल्याने ते कोणीतरी आम्हाला मदत करेल या आशेवर जगत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून मिळणारे मानधन त्यांना वेळेत मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे.
मानधन दिले जाणारे राष्ट्रीय स्तरावरील कलावंत, साहित्यिक - १९९६ मानधन दिले जाणारे राज्य स्तरावरील कलावंत, साहित्यिक - २५०१ मानधन दिले जाणारे जिल्हा स्तरावरील कलावंत, साहित्यिक - २४२०
मानधन किती (प्रती माह) राष्ट्रीय पातळीवरील कलाकार, साहित्यिक - २,१०० रु. राज्य पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १८०० रु. जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिक - १५०० रु.
कलावंत-साहित्यिकांच्या प्रतिक्रिया
अनंत वाळके (शाहीर) - घरात कमविते हात नसल्याने लॉकडाऊनपासून उपासमारीची वेळ आलेली आहे. सरकारकडून मिळणारे मानधन घरगाडा चालवायला हातभार लावतो. मात्र आता तेही वेळेवर येत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
चंद्रकांत चंदनशिवे (कवी) - एखादा कलावंत किंवा साहित्यिक मरण पावल्यानंतर मोठ्या कार्यक्रमांमधून श्रद्धांजली वाहण्यात येते. मात्र तोच कलावंत जिवंत असताना त्याच्यासाठी कोणीच काही करत नाही. सरकारतर्फे मिळणारे मानधन उशिरा मिळत असल्याने कुटुंबाचे हाल होत आहेत.
मंगला सुकाळे (गायिका) - पूर्वीप्रमाणे कार्यक्रम होत नसल्याने हाताला मिळेल ते काम करावे लागत आहे. सरकारने साहित्यिक व कलावंतांचा विचार करायला हवा. त्यांचे मानधन वाढवून व वेळेवर देण्यात यावे.