वैभव गायकर, पनवेलजिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खारघर ग्रामपंचायत ओळखली जाते. शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या खारघर ग्रामपंचायतीने स्वमालकीची शाळा काढून राज्यात शाळा काढणाऱ्या पहिल्या ग्रामपंचायतीचा मान यापूर्वीच मिळवला आहे. आता खारघरमध्ये दहावीत सर्वात जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला सरपंच वनिता पाटील यांनी आपले वर्षभराचे मानधन बक्षीस म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षी खारघर ग्रामपंचायतीतर्फे सरपंच वनिता विजय पाटील यांनी शहरामध्ये दहावीत ९0 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप वाटप केले होते. यंदा खारघरमध्ये दहावीत सर्वात जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला सरपंच संपूर्ण वर्षभराचे मानधन बक्षीस म्हणून देणार आहेत. सरपंच पाटील यांचा निर्णय इतरांसाठी आदर्शवत असल्याने परिसरात कौतुक होत आहे.
गुणवंताला सरपंच देणार वर्षभराचे मानधन
By admin | Published: June 11, 2015 10:49 PM