शारदा पुरस्काराने माझ्या लोककलेचा गौरव - डॉ. गणेश चंदनशिवे
By मनोहर कुंभेजकर | Published: April 28, 2023 06:54 PM2023-04-28T18:54:04+5:302023-04-28T18:54:12+5:30
विद्याधर गोखले, वसंत बापट, मधुसूदन कालेलकर, कुमार गंधर्व, शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सांगितिक आदरांजली
मुंबई - बोरीवली (पूर्व )येथील जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेने मला दिलेला 'शारदा' पुरस्कार हा माझ्या लोककलेचा गौरव म्हणावा लागेल या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली आहे, अशा शब्दांत लोककलेचे गाढे अभ्यासक, मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चाळीस वर्षापासून बोरीवली पूर्व येथील जय महाराष्ट्र नगर येथे वसंत व्याख्यानमाला सुरु असून यंदाच्या ४१ व्या वर्षी प्रथेप्रमाणे या वर्षी लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ गणेश चंदनशिवे यांना 'शारदा' पुरस्कार मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे माजी अध्यक्ष, शिवसेना उपनेते डॉ.विनोद घोसाळकर यांच्या हस्ते प्नदान करण्यात आला.
डॉ गणेश चंदनशिवे यांनी सन्मानचिन्ह , मानपत्र, शाल श्रीफळ आणि अकरा हजार रुपये रोख असा शारदा पुरस्कार जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेतर्फे डॉ.विनोद घोसाळकर यांच्या हस्ते स्वीकारला .सचिन वगळ यांनी मानपत्राचे खड्या आवाजात वाचन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या आयोजक प्रा. नयना रेगे यांनी खुमासदार शैलीत केले.
यावेळी बोलतांना डॉ गणेश चंदनशिवे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढा हा शाहिरांनी गाजविल्याचे सांगून शाहीर आत्माराम पाटील यांचा पोवाडा खड्या आवाजात गाऊन रसिक श्रोत्यांना या ज्वालाग्राही चळवळीची आठवण करून दिली.
वसंत बापट, मधुसूदन कालेलकर, विद्याधर गोखले, कुमार गंधर्व, शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रख्यात गायक श्रीरंग भावे, केतकी भावे जोशी यांनी 'शत स्मरण' या कार्यक्रमाद्वारे या महाराष्ट्राच्या महान सुपूत्रांना सांगितिक आदरांजली वाहिली. श्रेयसी मंत्रवादी यांनी अत्यंत समयोचित आणि समर्पक असे निवेदन केले.
डॉ.विनोद घोसाळकर यांनी आयोजक विजय वैद्य यांचा गौरव करतांना काही दिवसांपूर्वी ऑक्सिजनच्या नळ्या लावलेले विजय वैद्य हे वयाच्या ८१ व्या वर्षी ही जी धडपड वसंत व्याख्यानमालेसाठी करीत आहेत हे पाहता ते यासाठीच जगत असल्याचे दिसून येते. त्यामुळे ही वसंत व्याख्यानमाला सतत सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.