लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसर रेल्वे स्टेशन येथे दोन जेष्ठ नागरिकांचे प्राण वाचावणाऱ्या दोन शूरवीर कर्तव्यदक्ष पोलिसांचा आज शिवसेनेने सत्कार केला. शिवसेना उपनेते व म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर व मुंबई बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी शाल व सन्मानचिन्ह देऊन दहिसर पोलीस ठाण्यात व बोरीवली पोलीस ठाण्यात जाऊन सत्कार केला.
या वेळी दहिसर पोलीस ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात दहिसर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुहास पाटील, दहिसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एम. मुजावर, पोलीस निरीक्षक अनिल आव्हाड तसेच बोरीवली पोलीस ठाण्यात झालेल्या सत्कार कार्यक्रमात भास्कर पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.येथील दोन ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचवून दहिसरच्या शिरपेचात या दोन पोलिसांनी मानाचा तुरा रोवला आहे, असे गौरवोद्गार डॉ. विनोद घोसाळकर व अभिषेक घोसाळकर यांनी या वेळी काढले.
दि. १ जानेवारी रोजी दहिसर रेल्वे स्थानक येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर एक यात्रेकरू दहिसर येथून बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना तोल जाऊन पडला व लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये अडकून खेचला जाण्याच्या बेतात असताना तेथून जाणारे दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश हिरेमठ यांनी वेळीच प्रसंगावधान राखून त्या यात्रेकरूस बाहेर खेचून त्याचा जीव वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
असे वाचवले प्राणदि. १ जानेवारी रोजी गणपत सोलंकी हे साठ वर्षांचे गृहस्थ दहिसर येथून खारला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे होते. त्या वेळी दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून स्लो लोकल जाणार होती, ती पकडण्यासाठी फ्लाय ओव्हर ब्रिजचा वापर न करता रुळावर उडी मारून धावत दुसऱ्या बाजूस असलेली लोकल पकडण्याचा त्यांचा विचार होता. त्यानुसार त्यांनी रूळावर उडी मारली. परंतु विरुद्ध दिशेने येणारी फास्ट लोकल पाहता ते गांगरून गेले. त्यांना परत फलाटावर चढता येत नव्हते. हे दृश्य तिथे कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सुजीत कुमार यांनी पाहिले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गणपत सोलंकी यांना फलाटावर ओढून घेतले आणि त्यांचा जीव वाचविला.