मुंबई : मोजोस बिस्ट्रो रेस्टो पबमधील हुक्क्यातील निखा-यामुळे आगीचा भडका उडाला, या अग्निशमन दलाच्या प्राथमिक निष्कर्षावर आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अहवालात शिक्कामोर्तब केले आहे. कमला मिलमधील आगीच्या दुर्घटनेचा अहवाल आयुक्तांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सादर केला. या दुर्घटनेसाठी मिल मालक, वन अबव्ह व मोजोस रेस्टो पबचे मालक, वास्तुविशारद व अंतर्गत सजावटकार यांना दोषी ठरवून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर दहा अधिकाºयांची विभागीय चौकशी करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये दोन साहाय्यक आयुक्त आणि एका उपकार्यकारी आरोग्य अधिकाºयाचा समावेश आहे.गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी कमला मिल कंपाउंडमधील मोजोस बिस्ट्रो आणि वन अबव्ह या दोन रेस्टोबारमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत १४ जण गुदमरून मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीचे आदेश आयुक्तांना दिले होते. कमला मिल कंपाउंडमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने आयुक्तांना या चौकशी समितीवरून हटविण्याची मागणी राजकीय पक्षांनी अनेक वेळा केली. मात्र मुख्यमंत्री आपल्या निर्णयावर ठाम राहिल्याने आयुक्तांनी हा चौकशी अहवाल आज सादर केला.महापालिकेने यापूर्वीच पाच अधिकाºयांना निलंबित केले आहे. चौकशी अहवालातून आणखी दहा अधिकाºयांची खातेनिहाय चौकशी प्रस्तावित आहे. यामध्ये इमारत प्रस्ताव खाते, जी दक्षिण विभाग कार्यालय, मुंबई अग्निशमन दलातील अधिकाºयांचा समावेश आहे. तसेच साहाय्यक आयुक्तांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त होत होता. या अहवालात दोन साहाय्यक आयुक्त आणि एका उपकार्यकारी आरोग्य अधिकाºयाचीही चौकशी करण्याचे प्रस्तावित आहे.एफएसआय घोटाळ्याची चौकशीमिल कंपाउंडमध्ये विकास नियंत्रण नियमावली व माहिती तंत्रज्ञान धोरणाचा गैरवापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत सविस्तर सर्वेक्षण आणि विश्लेषण याची गरज असल्याने यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्याची मागणी आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.येथे सुधारणांची शिफारसउपाहारगृहे यांच्या संबंधातील परवानग्यांची पद्धत अधिक कठोर व गतिशील करावी. नियमांचे उल्लंघन करण्याºयांवर अधिक कठोर शिक्षेची तरतूद करणे तसेच मुंबई पालिका अधिनियमातील संबंधित कलमांमध्ये सुधारणांची शिफारस आयुक्तांनी केली आहे.कमला मिलच्या मालकाने अग्निसुरक्षा प्रतिबंधक बाबींची अंमलबजावणी केलेली नव्हती. त्यामुळे या आगीला व दुर्दैवी मृत्यूंना तेदेखील जबाबदार आहेत.या इमारतीमध्ये अत्यंत अव्यावसायिकपणे केलेले बांधकाम व ज्वालाग्राही पदार्थांचा वापर करून केलेली अंतर्गत सजावट यामुळे या घटनेची व्यापकता वाढली, हे लक्षात घेता संबंधित मिलचे मालक, दोन्ही रेस्टॉरंटचे मालक व संबंधित वास्तुविशारद व अंतर्गत सजावटकार यांना या घटनेला जबाबदार धरण्यात आले आहे.या सर्वांवर फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
पबमधील हुक्क्यातील निखा-यामुळे आगीचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 5:04 AM