शेफाली परब-पंडित
मुंबई : थकला भागलेला चेहरा आता तरी आपलं नावं यादीत असेल या आशेने मतदार केंद्रात शिरला. पण तिथेही तिची निराशा झाली. तरीही मोठ्या उमेदीने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी ती तिस-या मतदान केंद्राच्या शोधात निघाली. उच्चभ्रूवस्तीमधील मतदार घरी बसले असताना ६० वर्षीय हर्षा कांबळे मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी उन्हातान्हात फिरत होती.
मरीन ड्राईव्ह येथील एका इमारतीत घरकाम करणा-या कांबळे दुपारची कामं उरकून मतदान करण्यासाठी घराबाहेर पडली. गेली १५ वर्षे कांबळे मतदान करीत आहेत. मात्र यंदा तीन मतदान केंद्र फिरूनही त्यांचे नाव काही त्यांना सापडले नाही. भर उन्हातान्हात फिरताना त्यांना त्रास होत होता, पण मी मतदान करणारचं ही त्यांची जिद्द होती आणि याचसाठी त्या हळहळत होत्या.चर्चगेट येथील सिडनहम महाविद्यालयातील मतदान केंद्रातही नाव सापडले नाही..पण केसी महाविद्यालय येथील आणखी एक मतदान केंद्राच्या दिशेने त्या निघाल्या. मात्र त्यांना मतदान करताच आले नाही़ भेंडी बाजार येथील जैनाबिया ही १२० वर्षे जुनी इमारत आहे. अनेक निवडणुका तिने पाहिल्या मात्र यंदा या इमारतीचे नावचं मतदार यादीतून गायब असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. २०१७ मधील पालिका निवडणुकीतही आम्ही मतदान केले. मग यावेळेसचं नाव कसे मतदार यादीत नाही, असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांनी केला. या इमारतीत २८ फ्लटमध्ये सुमारे शंभर मतदार आहेत. यापैकी अनेकांचे नाव यादीत नाही. या इमारतीच्या पुर्नविकासाला विरोध केल्यामुळेचं नावं गायब करण्यात आली असावी, असा संशय रहिवाशांनी व्यक्त केला.