Join us

फेऱ्या वाढण्याची आशा धूसर

By admin | Published: October 07, 2015 3:52 AM

मध्य रेल्वेकडे पश्चिम रेल्वेवरील फक्त तीन सिमेन्स लोकलच ताफ्यात आल्याने आणि त्याबदल्यात जुन्या रेट्रोफिटेड लोकल मध्य रेल्वेने बाद केल्याने नवे वेळापत्रक तयार

मुंबई : मध्य रेल्वेकडे पश्चिम रेल्वेवरील फक्त तीन सिमेन्स लोकलच ताफ्यात आल्याने आणि त्याबदल्यात जुन्या रेट्रोफिटेड लोकल मध्य रेल्वेने बाद केल्याने नवे वेळापत्रक तयार करण्याचा विचार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि हार्बरवरील लोकल फेऱ्याही वाढण्याची आशा आता धूसर झाली आहे. पश्चिम रेल्वेने मात्र लोकलचे नवे वेळापत्रक नोव्हेंबरनंतरच बदलणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे.पश्चिम रेल्वेकडून सिमेन्स लोकल मिळाल्यावर म.रे.कडून जुन्या लोकल हद्दपार केल्या जातील. पश्चिम रेल्वेवर ७२ बम्बार्डियर लोकल येणार असून, यात ३ लोकल दाखल झाल्या आहेत. मध्य रेल्वेवर बम्बार्डियर लोकल चालवण्यात येणार नसल्याने त्याबदल्यात पश्चिम रेल्वेवरील सिमेन्सच्या लोकल मध्य रेल्वेला मिळतील. सध्या ३ बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेवर आल्याने त्या बदल्यात सिमेन्स लोकल मध्य रेल्वेला देण्यात आल्या आहेत. फारच कमी लोकल आल्याने नवे वेळापत्रक आखण्याची तयारी नसल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्याचप्रमाणे हार्बर मार्गाचे डीसी-एसी विद्युत परावर्तनाचे काम रखडले आहे. ते काम झाल्याशिवाय उपनगरीय लोकलचे वेळापत्रकही बदलता येणार नाही.