मुंबई - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृती फडणवीस यांनीही विरोधक म्हणून आपली भूमिका बजावायला सुरुवात केल्याचं दिसून आल. अमृता फडणवीस यांनी ट्विट करुन शिवसेनेवर टीका केली. आरेतील वृक्षतोडीला शिवसेनेने विरोध केला होता. त्यामुळे, ठाकरे सरकार येताच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. त्यावरुनच, अमृता फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रश्न विचारला होता. अमृता फडणवीस यांच्या या ट्विटला शिवसेनेनंही जशास तसं उत्तर दिलं आहे.
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवरुन अमृता यांनी शिवसेनेला ढोंगी असं म्हटलं होतं. औरंगाबाद येथे दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यासाठी, शिवसेना 1 हजार झाडं तोडणार आहे. त्यावरुन Get Well Soon शिवसेना असे म्हणत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली होती. हे फक्त कमिशनसाठी सुरू आहे. शिवसेनेचा ढोंगीपणा यातून समोर येतो असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
अमृता फडणवीस यांच्या ट्विटला उत्तर देताना शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही Get well soon... असे म्हणत खुलासा केला आहे. औरंगाबादमध्ये बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकही झाड कापलं जाणार नाही, असं प्रियंका यांनी सांगितलंय. त्यासाठी, औरंगाबाद महापालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या व्हिडिओचा संदर्भही त्यांनी दिला आहे. माझ्या उत्तराने तुमची निराशा होईल, पण रेटून खोटं बोलणं हेही रोगाचं लक्षण आहे. झाडांची कपात करणारे कमिशन मिळणं ही भाजपाची नवीन पॉलिसी आहे. आशा आहे, आपण लवकर बऱ्या व्हाल... असे म्हणत अमृता यांना जशास तसं उत्तर शिवसेनेकडून देण्यात आलंय.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच थेट टीका करत शिवसेनेला टार्गेट केलं आहे. विरोधी पक्षनेत्याच्या पत्नी म्हणून अमृता यांनीही आपली भूमिका बजावायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. मात्र, शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांना जशास तसं उत्तर देऊन लवकर बरे व्हा.. असा टोलाही लगावला.