लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अर्थसंकल्पातून राज्यातील कोणत्याच घटकाला फारसे काही मिळणार नाही. केवळ घोषणांचा अवकाळी पाऊस पाडण्याचे काम झाले आहे. त्यामुळे जनतेच्या आशा-आकांक्षा वाहून गेल्या. हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात आहे’, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
अर्थसंकल्पावरील चर्चेला सुरुवात करताना पवार यांनी अर्थसंकल्पातील अनेक त्रुटी समोर आणल्या. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी मुद्दा क्रमांक १२६ आणि १६५ हे दोन महत्त्वाचे मुद्दे गाळले आहेत. त्याचा सरकारकडून खुलासा करावा अशी मागणी करत मागच्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी न करता केवळ शिंदे गटाच्या ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण करण्यात आली आहे, असा आरोपही केला.
कांदा, द्राक्ष, हरभरा, कापूस, सोयाबीन यांसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याला गुजरातच्या धर्तीवर पॅकेज देण्यासाठी सरकारची इच्छा नाही, त्यामुळेच एक रुपयाचीही तरतूद त्यासाठी नाही, असेही पवार म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"