ध्वनी प्रदूषणाविरोधात 'आवाज'; अनोख्या कॅम्पेनची जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 11:54 AM2018-04-04T11:54:01+5:302018-04-04T11:54:01+5:30
ध्वनी प्रदूषणाविरोधात हटके कॅम्पेन
फोटोतल्या रिक्षावरचे सर्व भोंगे एकत्र वाजले तर काय होईल?, याचा थोडा विचार करा. रिक्षावर लावलेले सर्व भोंगे एकाचवेळी वाजू लागले तर कानांना किती प्रचंड त्रास होईल, याची कल्पनाच केलेली बरी. मुंबईतील याच ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज फाऊंडेशन 'आवाज' उठवला आहे. मात्र हा आवाज शब्दश: नव्हे, तर कृतीतून उठवण्यात आला आहे. 'आवाज फाऊंडेशन'ने सध्या 'हॉर्न व्रत' कॅम्पेन सुरू केले आहे. राज्य वाहतूक विभाग, रिक्षा मेन्स युनियन आणि मुंबई पोलिसांच्या सौजन्याने हे कॅम्पेन राबवले जात आहे.
'हॉर्न व्रत' कॅम्पेनअंतर्गत मुंबईच्या रस्त्यावर एक रिक्षा फिरते आहे. यावर भोंगे लावण्यात आले असून 'ध्वनी प्रदूषण टाळा' असा संदेश यामधून दिला जात आहे. आवाज फाऊंडेशनने 27 जानेवारीपासून या कॅम्पेनची सुरुवात केली. गेटवे ऑफ इंडियापासून या कॅम्पेनला सुरुवात झाली. ध्वनी प्रदूषणाविषयी जनजागृती करण्यासाठी ही रिक्षा शहराच्या कानाकोपऱ्यात फिरते आहे. ही रिक्षा आणि त्या माध्यमातून दिला जाणारा संदेश सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
मुंबईत दर तासाला 1 कोटी 80 लाखवेळा हॉर्न वाजवला जातो, असे आवाज फाऊंडेशनची आकडेवारी सांगते. मुंबईत प्रवास करण्यासाठी अनेकजण रिक्षाचा वापर करतात. त्यामुळेच आवाज फाऊंडेशनकडून या अनोख्या कॅम्पेनसाठी रिक्षाचा वापर केला जात आहे. या कॅम्पेनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन फाऊंडेशनकडून रिक्षा चालकांना करण्यात आले आहे.