Join us

दादर मंडईतील धक्कादायक प्रकार; पायाने गाजर धुणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 7:35 PM

बाजार विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. 

ठळक मुद्देमंडईत पायाने गाजर धुतले जात असल्याचा व्हिडीओ सोमवारी वायरल झाला होता.गेली दोन दिवस या ठिकाणी पालिकेच्या बाजार विभागामार्फत कारवाई सुरु आहे. 

मुंबई -  कुर्ला रेल्वे स्थानकावर दूषित पाण्यात लिंबू सरबत तयार करीत असल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उजेडात आला होता. त्यानंतर आता महापालिकेच्या दादर पश्चिम येथील मंडईत चक्क पायाने गाजर धुतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर अडचणीत आलेल्या महापालिकेने या मंडईतील संबंधित गाळेधारकांना दंड ठोठवला आहे. तसेच बाजार विभागाने गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. 

दादर पश्चिम येथील क्रांतीसिंह नाना पाटील मंडईत पायाने गाजर धुतले जात असल्याचा व्हिडीओ सोमवारी वायरल झाला होता. याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटल्यामुळे पालिकेच्या बाजार विभागाचे धाबे दणाणले. बाजार विभागाच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी केलेल्या कारवाईनुसार या मंडईतील गाळा क्रमांक ८३, ८७, ८९,८१ च्या गाळेधारकांना अस्वच्छता केल्याप्रकरणी एक हजार रुपये दंड प्रत्येकी वसूल करण्यात आला आहे. गेली दोन दिवस या ठिकाणी पालिकेच्या बाजार विभागामार्फत कारवाई सुरु आहे. 

तर बुधवारी गाळा क्रमांक ४७,६०,५५,६६, १२९, १७३, १८६ वर अस्वछता केल्याबद्दल एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गाळा क्रमांक १७३, १८६, ९०, १५२, १२९, ६६, ५७,६०,५५ बाजार विभागाच्या नियमानुसार पहिली नोटीस पाठविण्यात आली आहे. त्याचबरोबर गाजर धुण्याचे मोठे १९ ड्रम, एक छोटा ड्रम जप्त करून पालिकेने आपल्या ताब्यात घेतला आहे. त्यामुळे गाजर पायाने धुणे आता या मंडईमध्ये बंद झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. मात्र ही एकाच मंडईवरील कारवाई असल्याने इतर मंडईत असा प्रकार सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :नगर पालिकामुंबईबाजार