मुंबईतील कोरोनाचे भयावह चित्र अनाठायी - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 03:41 AM2020-05-30T03:41:50+5:302020-05-30T11:38:07+5:30
पावसाळ्यातील साथी रोखण्यासाठी जय्यत तयारी
मुंबई : कोरोनाविषयी मुंबई परिसरातील जे भयावह चित्र उभे केले जात आहे ते अनाठायी असून आम्ही प्रयत्नपूर्वक कोरोना विषाणूला नियंत्रणात नक्की आणू, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला.
मुंबईत महापौर बंगल्यात काही निवडक संपादकांशी त्यांनी संवाद साधला. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल आदी या वेळी उपस्थित होते.महानगर परिसरात ३१ मेपर्यंत दीड लाख लोकांना कोरोना होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात आजचे आकडे तुलनेने खूप कमी आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कोरोनविषयी मुंबई परिसरातील जे भयावह चित्र उभे केले जात आहे ते अनाठाई असून आम्ही प्रयत्नपूर्वक कोरोना विषाणूला नियंत्रणात नक्की आणू असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केला.
मुंबईत महापौर बंगल्यात काही निवडक संपादकांशी त्यांनी संवाद साधला. राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल आदी उपस्थित होते. महानगर परिसरात 31 मार्चपर्यंत दिड लाख लोकांना कोरोना होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता, परंतु प्रत्यक्षात आजचे आकडे तुलनेने खूप कमी आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, मुंबईतील सर्व मोठया जागा ताब्यात घेऊन कोविड हॉस्पिटल बनविली आहेत. पुढील आठवड्यापासून ती कार्यरत होतील. तब्बल दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई परिसरात प्रत्यक्षात सुमारे 33 हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यातील सहा हजार अतिदक्षता विभागात आहेत. आम्ही खाजगी रुग्णालयांसोबत सातत्याने चर्चा केली. काहींनी थोडी आडमुठी भूमिका घेतली तरी त्यांना कोविड - नॉन कोविड रुग्णालयात रूपांतर करण्यात यश मिळवले. कोविडची सर्व बेड्स ऑनलाईनवर आणणार आहोत.
त्यामुळे बेड उपलब्ध नसल्याच्या तक्रारी कमी होतील. येत्या 15 दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यातून कदाचित नेहमीचे व्हायरल म्हणजे फ्लू, मलेरिया सारखे संसर्ग डोके वर काढतील. त्यामुळे कोविड आणि सर्दी-पडसे एकाच वेळी त्रासदायक ठरू शकतील. या साथीच्या रोगांबरोबर कोरोनाला रोखायचे आहे. आम्ही धीराने याचा सामना करीत आहोत. कोरोनाचे अद्याप औषध नसले तरी त्यातून बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. अगदी व्हेंटिलेटरपर्यंत जाऊन रुग्ण ठणठणीत होऊन घरी परत गेले आहेत. त्यामुळे लोकांनी योग्य काळजी घेतली तर कोरोनाला रोखण्यात आम्ही नक्की यशस्वी ठरू. असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा जेव्हा पहिला रुग्ण राज्यात सापडला तेव्हा राज्यात फक्त दोन चाचणी केंद्र होती. गेल्या दोन महिन्यात आपण तब्बल 72 चाचणी केंद्र उभे केले. अजून सत्तावीस केंद्रांना परवानगी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात 100 चाचणी केंद्रे उभी असतील त्यातून सर्वाधिक वेगाने चाचण्या होतील. असे मुख्य सचिव अजय मेहता यांनी यावेळी सांगितले. आपल्या राज्यात सर्वाधिक चाचण्या होत असल्यानेच आकडा मोठा दिसतो असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले.