धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीचे कागदी घोडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 01:05 AM2020-03-02T01:05:08+5:302020-03-02T01:05:15+5:30
‘खेळ कोणाला दैवाचा कळला, दैव लेख ना कधी कोणा टळला’ हे जरी खरे असले तरी, दैवावर किती आणि कोणत्या गोष्टी अवलंबून ठेवाव्यात हे ज्याचे त्याने ठरवावे.
- शेफाली परब - पंडित
मुंबई : ‘खेळ कोणाला दैवाचा कळला, दैव लेख ना कधी कोणा टळला’ हे जरी खरे असले तरी, दैवावर किती आणि कोणत्या गोष्टी अवलंबून ठेवाव्यात हे ज्याचे त्याने ठरवावे. मुंबईतील अतिधोकादायक पूल आणि त्यावरून प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांचे भवितव्य महापालिकेने असेच दैवावर सोडल्याचे दिसून येत आहे. दिवसभराचे काम आटोपून घराकडे निघालेले सात पादचारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेत मृत्युमुखी पडले. या हृदयद्रावक घटनेला १४ मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु मुंबईतील धोकादायक पुलांची स्थिती ‘जैसे थे’च असून आजही मुंबईकरांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
गेल्या आठवड्यात दादर पूर्व आणि पश्चिमेला जोडणाºया टिळक पुलावरील पदपथाच्या टाइल्सला तडे गेले. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. मात्र १९२३ मध्ये बांधलेला हा ब्रिटिशकालीन पूल आज धोकादायक स्थितीत आहे. स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये या पुलाची तातडीने पुनर्बांधणीची शिफारस करण्यात आली आहे. हा एकमेव धोकादायक पूल नसून अशा आणखी २९ पुलांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. मात्र हँकॉक आणि कर्नाक बंदर या दक्षिण मुंबईतील दोन महत्त्वाच्या पुलांच्या कामाचा वेग पाहून पालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन दिसून येत आहे.
शहर भागातील ब्रिटिशकालीन पुलांची वयोमर्यादा संपली आहे. याबाबत काही वर्षांपूर्वी ब्रिटिश सरकारने तत्परतेने महापालिकेला पत्राद्वारे स्मरण करून दिले. परंतु, त्याच तत्परतेने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात उदासीनता दिसून येत आहे. मुंबईतील २९६ पुलांचे २०१४ मध्ये आॅडिट करण्यात आले. मात्र या आॅडिटला सहा वर्षे पूर्ण झाली, तरी पुलांच्या दुरुस्ती अथवा पुनर्बांधणीचे काम कागदावरच आहे. या मधल्या काळात जुलै २०१८ मध्ये अंधेरी येथील गोखले पूल आणि १४ मार्च २०१९ रोजी सीएसएमटी येथील हिमालय पूल दुर्घटनेत निष्पाप मुंबईकर बळी गेले. याउलट आॅडिटमध्येच घोटाळा झाल्याचे समोर आले. या धोकादायक पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची शिफारस स्ट्रक्चरल आॅडिटरने केली होती.
नव्याने केलेल्या आॅडिटमध्ये आधी किरकोळ दुरुस्ती सुचवलेल्या अनेक पुलांची तातडीने मोठी दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे उजेडात आले. मात्र वर्षभरात केवळ पुलांच्या दुरुस्तीचे कागदी घोडे नाचविण्यात आले आहेत. चार वर्षांपूर्वी हँकॉक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यापाठोपाठ कर्नाक बंदर पूलही धोकादायक असल्याने अवजड वाहनांसाठी बंद केला. या पुलांच्या कामाला अद्याप वेग नाही.
या विलंबामुळे खर्च तेवढा वाढतो आहे. माझगाव येथील हँकॉक पुलाच्या दुरुस्तीचा खर्च चार वर्षांत २५ कोटींनी वाढला आहे. या पुलाची पुनर्बांधणी होत नाही, तोपर्यंत मशीद बंदर येथील कर्नाक पुलाची पुनर्बांधणी रखडणार आहे. अनेक तांत्रिक अडचणींबरोबर प्रशासकीय त्रुटीदेखील या पुलाचे काम रेंगाळण्यास कारणीभूत आहे.
लोअर परळचा डिलाईल रोड पूल २०१८ पासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबईतील वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यात गेल्या वर्षभरात २९ अतिधोकादायक पुलांपैकी काही पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने अडचणीत भर पडली आहे.
>सध्या आणखी काही काळ जीव मुठीत घेत करावा लागणार प्रवास
शहर व उपनगरातील दोनशे पुलांची छोटी-मोठी दुरुस्ती होणार आहे. दक्षिण मुंबईतील या महत्त्वाच्या पुलांवर मुंबईतील वाहतूक अवलंबून आहे. त्यामुळे या पुलांची पुनर्बांधणी करताना मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडू नये यासाठी पर्यायी मार्ग, नियोजन आवश्यक आहे. परंतु, असे कोणतेही नियोजन प्रशासकीय पातळीवर दुर्दैवाने दिसून येत नाही. परिणामी, पुलांच्या पुनर्बांधणीचा मुहूर्त महापालिका कधी काढणार? प्रत्यक्षात या पुलांची पुनर्बांधणी केव्हा पूर्ण होणार? याबाबत सांगणे कठीण झाले आहे. अशा धोकादायक पुलावरून प्रवास करताना मुंबईकरांना मात्र आणखीन काही काळ जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.