सभापतिपदासाठी घोडेबाजार तेजीत
By Admin | Published: March 22, 2015 01:42 AM2015-03-22T01:42:53+5:302015-03-22T01:42:53+5:30
महापालिका स्थायी समितीत नव्या आठ सदस्यांची नियुक्ती झाली असून, विरोधी व सत्ताधारी पक्षाकडे समसमान सदस्य आहेत.
उल्हासनगर : महापालिका स्थायी समितीत नव्या आठ सदस्यांची नियुक्ती झाली असून, विरोधी व सत्ताधारी पक्षाकडे समसमान सदस्य आहेत. त्यामुळे सभापतिपदासाठी घोडेबाजार तेजीत असून महापौर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही सदस्यांची पळवापळवी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आठ नव्या सदस्यांमध्ये लीला आशान, राजेंद्रसिंग भुल्लर व अपक्ष सुनील सुर्वे, राष्ट्रवादी पक्षाकडून ओमी कलानी, गुरू वलेच्छा, भाजपाचे जमनुदास पुरस्वानी, काँग्रेसच्या अंजली साळवे, तर साई पक्षाकडून आशा इदनानी यांची नियुक्ती झाली आहे. समितीत शिवसेनेचे ४, भाजपा- ३, रिपाइं १, राष्ट्रवादीचे ४, काँग्रेस २ व साई पक्षाचे २ असे पक्षीय बलाबल आहे.
महापालिकेतील बहुमताच्या जोरावर शिवसेना-भाजपा व रिपाइंला नामोहरम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जात आहे. सभापतिपद पटकावण्यासाठी आघाडीने कंबर कसली असून, कोणता समिती सदस्य आघाडी व विरोधकांच्या गळ्याला लागतो, यावर सभापतिपद अवलंबून आहे. युतीतील अंतर्गत करारनाम्यानुसार सभापतिपद भाजपाच्या वाट्याला गेले असून, राम चार्ली यांचे नाव पुढे आले आहे. राष्ट्रवादीकडून ओमी कलानी यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत ज्योती कलानी यांना मदत केल्याचा मोबदला म्हणून साई पक्षाकडे स्थायी समिती पद जाण्याची शक्यता आहे. त्यांनी इतर सदस्यांना डावलून माजी महापौर आशा इदनानी यांचे नाव पुढे केल्याने पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.