लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच असून भांडुपच्या हनुमान नगरमध्ये शनिवारी घरासह संरक्षक भिंत कोसळली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र चाळीजवळची भली मोठी भिंत कोसळल्याने येथे राहणाऱ्या रहिवाशांचे नुकसान झाले आहे. पालिकेने वेळेत या रहिवाशांना घरे रिकामी करण्याची नोटीस दिली असती तर नुकसान टाळता आले असते मात्र दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी घरे रिकामी करण्याची नोटीस बजावल्याने रहिवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर हा डोंगराळ वस्तीचा भाग असून डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे आहेत. शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास येथील चाळीत राहणारे सुहास म्हापणकर, मधुकर शिंदे आणि मसाजी गायकवाड यांच्या घराचा काही भाग कोसळला तर रविवारी पहाटे ४ वाजता येथील संरक्षक भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचा काही भाग कोसळल्याने नुकसान झाले. पालिकेच्या एस वॉर्डमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनेनंतर या ठिकाणी धाव घेतली व तेथील लोकांना घरे रिकामी करण्याच्या नोटिसा बजावल्या. त्यामुळे या चाळीतील ४० कुटुंबे सध्या दुसऱ्या ठिकाणी राहत आहेत. मात्र, या घटनेपूर्वी पालिकेने नोटीस बजावली असती अथवा येथील संरक्षक भिंतीची डागडुजी केली असती तर ही घटना घडली नसती असे मत येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.
सहायक आयुक्तांसह एनडीआरएफ घटनास्थळीया घटनेनंतर एस वॉर्डचे सहायक आयुक्त महादेव शिंदे हे एनडीआरएफच्या पथकासह घटनास्थळी पाहणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी आले होते. तेव्हा स्थानिक नागरिकांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. सहायक आयुक्त शिंदे यांनीदेखील रहिवाशांच्या तक्रारी ऐकून घेतल्या.
घराचा काही भाग कोसळल्यामुळे नुकसान झाले असून पावसात कुठे जायचे असा प्रश्न पडला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर आमचे पुनर्वसन करायला हवे.- विश्वास म्हापणकर, रहिवासी