दहावीच्या निकालानंतर बस उपलब्ध : शिक्षकांसाठी रेल्वे परवानगी नाहीच
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षकांनी अनेक अडचणींवर मात करत दहावीच्या निकालाचे ९९ टक्के काम पूर्ण केले आणि मुंबईतही ९८.६१ टक्के निकालाचे काम पूर्ण झाले आहे. रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्याने शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र आता निकालांचे थोडेच काम शिल्लक असताना शिक्षण विभागाकडून मुंबईतील आणि मुंबईबाहेरून प्रवास करणाऱ्या शिक्षकांना राज्य परिवहन सेवेच्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दहावी निकालाचे काम पूर्ण झाल्यावर शिक्षण विभागाला जाग आली असून, शालेय शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे अशी टीका शिक्षक, मुख्याध्यापकांमधून होत आहे.
शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे शिक्षकांना रेल्वे प्रवासाची परवानगी मिळाली नाहीच, यावरही शिक्षकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ५ जुलैपासून एसटीची सेवा सुरू होणार असून, त्यांचे वेळापत्रक उपसंचालक विभागाकडून प्रत्येक विभागीय शिक्षण निरीक्षक कार्यालयाला दिले. सद्यस्थितीत ही सेवा पदवीच्या शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध आहे. लवकरच ती बारावीच्या शिक्षक, प्राचार्यांसाठीही उपलब्ध करून देण्यात येईल, अशी महिती उपसंचालक संदीप संगवे यांनी दिली.
शिक्षण विभागाने रेल्वे प्रवासाची परवानगी न देता बस उपलब्ध करून देण्यामागे शिक्षकांची चेष्टा करण्याचा उद्देश आहे का? अशा सेवा आम्हाला नको असे मत मांडत राज्य शिक्षक परिषदेकडून या सेवेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. दहावीच्या निकालाचे काम आता पूर्ण झाल्याने त्यांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे, अशी मागणी परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. दरम्यान, काही शिक्षकांनी दहावीच्या निकालासाठी नाही तर बारावीच्या निकालाच्या वेळी बससेवा उपलब्ध करून दुजाभाव केल्याचाही ठपका शिक्षण विभागावर ठेवला आहे.
१२ वीचा निकाल तयार करणारे शिक्षक व शिक्षकेतर, मुख्याध्यापकांना बसऐवजी स्वतंत्र उपनगरीय रेल्वेगाड्या सोडून गर्दी टाळता येईल. वातानुकूलित लोकल पूर्णपणे रिकाम्या जात असल्याने बारावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांसाठी या विशेष गाड्या म्हणून सोडाव्यात, अशी आमची मागणी आहे.
- शिवनाथ दराडे, कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद, मुंबई