रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड
By admin | Published: April 9, 2016 03:43 AM2016-04-09T03:43:43+5:302016-04-09T03:43:43+5:30
उलट्या आणि तापावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या नितीन खाडे या ४५वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत
मुंबई : उलट्या आणि तापावरील उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या नितीन खाडे या ४५वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत खाडे यांच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. या प्रकरणी भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भांडुप जंगल मंगल रोड परिसरात खाडे हे कुटुंबीयांसोबत राहत होते. ताप आणि उलट्या सुरू झाल्याने त्यांना मागील आठवड्यात तेथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. अपेंडीस आणि लिव्हरच्या बाजूला पू झाल्यामुळे शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी बुधवारी सांगितले.
दरम्यान, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या आरोपातून संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. शवविच्छेदनासाठी खाडे यांचा मृतदेह जे.जे. रुग्णालयात पाठविण्यात आला.
त्यांचा शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवालही गुप्त ठेवण्यात आला आहे. त्याचे व्हिसेरा (अंतर्गत अवयव) फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
फॉरेन्सिक अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भांडुप पोलिसांनी दिली.