रुग्णाकडून अतिरिक्त बिल आकारणे हॉस्पिटलला भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 01:28 AM2020-01-04T01:28:00+5:302020-01-04T01:28:06+5:30
ग्राहक मंचाचा आदेश; रुग्णाच्या नातेवाइकाला १.३३ लाख रुपये नुकसानभरपाई द्या
मुंबई : रुग्णाचे नातेवाईक व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांमधील गैरसमजुतीमुळे रुग्णाच्या नातेवाइकाकडून बिलाची जादा रक्कम आकारल्याबद्दल ग्राहक तक्रार निवारण मंचाने एशियन हार्ट इन्स्टिट्यूट अॅण्ड रिसर्च सेंटर (हॉस्पिटल)ला संबंधित रुग्णाच्या नातेवाइकाला १,३३,४८२ रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.
वांद्रे (पश्चिम) येथे राहणारे विनय भसीन यांच्या वडिलांना २१ एप्रिल २०१५ रोजी अॅन्जिओग्राफी करण्याकरिता दाखल करण्यात आले. तिथे त्यांना समजले की, त्यांच्या वडिलांच्या आर्टरीमध्ये ब्लॉकेज आहेत. तिथे त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी पाठविण्यात आले. त्या डॉक्टरांनी रुग्णावर करोनरी आर्टरी बायपास ग्राफ सर्जरी (सीएबीजी) करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर रुग्णालय कर्मचाºयाने विनय यांना सीएबीजीकरिता डिलक्स रूमसहित असलेले हॉस्पिटलचे पॅकेज ६,७९,१०० रुपये असल्याचे सांगितले. त्यात सर्जरी प्रोसिजर, आॅपरेशनसाठी लागणारे सामान, रुग्णाला मधुमेह असल्याने लागणारे जास्तीच्या शुल्काचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. विनय यांनी हे पॅकेज स्वीकारले. त्यानंतर वडिलांचे आॅपरेशन सुरू असताना हॉस्पिटलची अन्य एक कर्मचारी विनय यांना भेटली. रुग्ण ‘हाय रिस्क पेशंट’ असल्याने हॉस्पिटलचे एकूण बिल ६,९३,००० रुपये इतके होईल, असे सांगण्यात आले. त्यास विनय यांनी विरोध दशर््विला. मात्र, वडिलांचे आॅपरेशन सुरू असल्याने ती रक्कम देण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. मात्र, वडिलांना हॉस्पिटलमधून सोडताना देण्यात आलेले अंतिम बिल पाहून विनय यांना धक्का बसला. त्यांना ९,६७,१८२ रुपये भरण्यास सांगण्यात आले. याबाबत विनय यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी वाद घातला. तर हॉस्पिटलने बिल भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही, अशी धमकी भसीन यांना दिली. त्यामुळे नाईलाजास्तव भसीन यांना अंतिम बिलाची रक्कम भरावी लागली.
या वाढीव बिलाबद्दल भसीन यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आणि हॉस्पिटलने त्यास उत्तर देताना म्हटले की, कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्यातील गैरसमजुतीमुळे हा गोंधळ उडाला. मात्र, योग्य बिल देण्यात आल्याचा दावा हॉस्पिटलने केला. हॉस्पिटलने अनुचित व्यापारी प्रथेचा व कर्तव्यास कसूर करत आपल्याकडून २,७४,१८२ इतकी अधिक रक्कम वसूल केल्याचा आरोप करत भसीन यांनी ग्राहक मंचात हॉस्पिटलविरोधात तक्रार केली.
त्यावर हॉस्पिटलने तक्रारदाराचे सर्व आरोप फेटाळले. आॅपरेशनपूर्वी भसीन यांना शुल्काची माहिती देण्यात आली होती. आॅपरेशन करत असताना त्यांना याबाबत माहिती दिली नव्हती. रुग्ण ‘हाय रिस्क’ संवर्गातील असल्याने तक्रारदाराला अतिरिक्त शुल्काबाबत माहिती देण्यात आली होती. तक्रारदाराने बिलाची सर्व रक्कम भरली. त्यामुळे ही तक्रार त्यांनी पश्चातबुद्धीने केली आहे. मात्र, ग्राहक मंचाने भसीन यांना अंशत: दिलासा देताना म्हटले की, हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क कशासाठी आकारले, याची माहिती हॉस्पिटलने तक्रारदाराला दिली नाही. त्यामुळे त्यांनी सेवेत कसूर केली आहे.
तक्रारदाराला अतिरिक्त शुल्काची कल्पना होती - मंच
भसीन यांचा २,७४,१८२ इतकी अधिक रक्कम वसूल केल्याचा दावा मंचाने फेटाळला. हॉस्पिटलने ब्रोशरमध्ये ‘हाय रिस्क’ रुग्णांसाठी किती अतिरिक्त शुल्क लागेल, याची माहिती दिली आहे. त्यामुळे तक्रारदाराला आपल्याला किती अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, याची कल्पना होती, असे मंचाने म्हटले. मात्र, हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्काव्यतिरिक्तही ६३,४८२ रुपये अधिक शुल्क भसीन यांच्याकडून आकारल्याने मंचाने ही रक्कम परत करण्याचा आदेश हॉस्पिटलला दिला.