Hospital Fire: "ढिसाळ कारभारामुळे पुन्हा १२ बळी; ठाकरे सरकार हे तुम्हीच करून दाखवलं!"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 01:32 PM2021-03-27T13:32:51+5:302021-03-27T13:41:05+5:30
सदर घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांच्या मृत्यूची भीषण दुर्घटना ताजी असतानाच, गुरुवारी मध्यरात्री भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये कोरोना उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या सनराईज रुग्णालयाला लागलेल्या आगीत १२ रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर पाच रुग्ण गंभीर जखमी आहेत. शिवाय दोन मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेची गंभीर दखल घेतली असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. या रुग्णालयात ७८ रुग्ण उपचार घेत होते. ६७ रुग्णांची सुखरूप सुटका करण्यात आली. धुरामुळे श्वास गुदमरून ९ रुग्णांचा मृत्यू ओढवला. भांडुप पश्चिमेकडे असलेल्या तीन मजली ड्रीम्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सनराईज या रुग्णालयास गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली.
सदर घटनेवरुन भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले...ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं, अशी टीका भाजपाने ट्विटरद्वारे केली आहे.
भंडाऱ्यात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्यानं अवघा महाराष्ट्र हळहळला. पण सरकारी कारभारावर ढिम्म परिणाम झाला. हा प्रकार झाल्यानंतरसुद्धा एकाही रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणा लागली नाही आणि भांडुपच्या आगीत १२ रुग्ण दगावले... ठाकरे सरकार, हे तुम्हीच करून दाखवलं! pic.twitter.com/Rt8jl3c9c9
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2021
तत्पूर्वी, अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरुवातीला तीन फायर इंजिन आणि दोन जंबो टँकर यांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू केले. शुक्रवारी पहाटे आगीने पुन्हा जोर पकडला. मॉलमधील १०० ते २०० मीटर परिसरातील दुकानांना आग लागून इलेक्ट्रिक साहित्य, लाकडाचे फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग आणि रुग्णालयातील बहुतांश साहित्य जळून खाक झाले.
आग विझविण्याचे काम सुरू असतानाच मॉलच्या तिन्ही मजल्यांवर मोठ्या प्रमाणावर धूर पसरला. आग विझवण्यासाठी रोबो २०, मोटार पंप, १५ जंबो टँकर, ३ वॉटर टँकर इत्यादींसह इतर अत्याधुनिक साहित्याची मदत घेण्यात आली. आगी सोबतच धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर उठल्याने आग विझविण्यात अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
मॉलमध्ये कोविड रुग्णालय का?
मॉलमध्ये कोविड रुग्णालय असणे ही गंभीर बाब असून, याबाबत सर्वंकष चौकशीचे आदेश दिले आहेत. सनराईज रुग्णालयाला २८ फेब्रुवारी २०२१ला बंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, ३१ मार्च २०२१पर्यंत रुग्णालय बंद करू, असे रुग्णालय व्यवस्थापनाने महापालिका प्रशासनाला सांगितले होते. त्यानंतर कोविडची रुग्णसंख्या वाढल्याने हे रुग्णालय पुन्हा सुरू झाले होते. - किशोरी पेडणेकर, महापौर
७१ जण सुखरूप बाहेर
मॉलच्या गच्चीवर काही लोक अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. गच्चीवरील लोकांना सुरक्षित बाहेर काढत असतानाच रुग्णालयातील रुग्णांना अत्यंत सुरक्षित बाहेर काढण्याचे मोठे आव्हान अग्निशमन दलासमोर होते. अग्निशमन दलाच्या मोठ्या शिडीच्या मदतीने येथे अडकलेल्या सुमारे ७१ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा आणि रुग्णांचा समावेश आहे.
सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत, त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तपासणी तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. ही घटना दुर्दैवी आहे. यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.