मुंबई : सनराईज रुग्णालयाला लागलेली आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने प्राणांची बाजी लावली. मात्र त्यांना येथील रुग्णालयातील प्रत्येकालाच वाचविता आले नाही.
गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता आग लागली तेव्हाच मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मध्यरात्री लागलेली आग शुक्रवारी पहाटे भडकली. तोपर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी धुरामुळे येथे अनेक अडचणी आल्या. शिवाय आतील अग्निरोधक यंत्रणाही वेळेला उपयोगी पडली नाही, असे स्थानिकांनी सांगितले. आग विझविण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचाही वापर करण्यात आला. मात्र मॉलच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पसरलेली आग आणि आगीच्या कचाट्यात सापडलेली मॉलची मागील बाजू, आतील छोटे गाळे आणि मॉलवर लावलेल्या काचा अशा अनेक कारणांमुळे आग विझविताना अडथळे आले.
लॉकडाऊनमुळे दुखभाल-दुरुस्ती रखडली!
कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल बरेच महिने बंद होता. आता कुठे ताे सुरू झाला होता. मात्र मॉलची देखभाल-दुरुस्ती झाली नव्हती. यात येथील अग्निरोधक यंत्रणेचाही समावेश होता. येथील अग्निरोधक यंत्रणेची दुरुस्ती झाली असती तर आग विझविण्यास मदत झाली असती. लॉकडाऊनमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे देखभाल करण्यासाठीदेखील लोकांकडे पैसे नव्हते. नाहीतर देखभाल-दुरुस्ती कधीच झाली असती, असे येथील नुकसान झालेल्या दुकानदारांनी सांगितले.
९ इंचाची लाइन आली मदतीला धावून
मॉलच्या मागील बाजूस एक मोठी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीद्वारे मॉलच्या मागील इमारतींसह लगतच्या वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो. ही जलवाहिनी ९ इंचांची आहे. आग विझविण्यासाठी या जलवाहिनीतून पाणी घेण्यात आले. येथील वॉल उघडण्यात आला. हे करताना लगतच्या परिसरातील इमारतींचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. कारण आग विझविण्यासाठी दाबाने पाणीपुरवठा गरजेचा होता. यासाठी मुंबई महापालिकेच्या एस विभागाच्या जल खात्याचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले हाेते. येथे तैनात चार ते पाच कर्मचारी आग लागल्यापासून आग विझेपर्यंत कार्यरत होते. येथील फायर हायड्रंटला अग्निशमन दलाचा पाइप जोडण्यात आला आणि आग विझविण्यासाही वेगाने पाणीपुरवठा करण्यात आला, अशी माहिती येथे तैनात जलविभागाच्या कर्मचाऱ्याने दिली.
दुकाने नाहीत, स्वप्ने जळाली...
मॉलमध्ये ज्वेलरी, गारमेंट, वस्त्र, संगणक, फरसाण अशी विविध प्रकारची दुकाने आहेत. मॉलच्या एका बाजूला लागलेली आग दुसऱ्या बाजूपर्यंत पसरल्याने बहुतांश दुकाने जळून खाक झाली. मॉलच्या मागील बाजूस असलेली सगळी दुकाने जळाल्याचे दुकानदारांनी सांगितले. यातील बहुतांश दुकानदार मॉलच्या समोरील आणि मागील प्रवेशद्वारावर हताश नजरेने बसले होते. ज्या महिलांची दुकाने होती त्यांना अश्रू अनावर झाले हाेते. तोंडातून शब्द फुटत नव्हते. नुकसानभरपाई मिळणार की नाही, असा प्रश्न त्यांना सतावत होता. कोरोना, लॉकडाऊन आणि आता आग अशा संकटात सापडल्याने त्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. दुकाने नाहीत तर स्वप्न जळाल्याचे अनेकांनी हतबलतेने सांगितले.