Join us

Hospital Fire: ड्रीम्स मॉलच्या आगीप्रकरणी सात जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 1:56 AM

वाधवान पिता-पुत्रासह हॉस्पिटलच्या संचालकांचा समावेश

मुंबई : भांडुपमधील ड्रीम्स मॉलमधील आगीप्रकरणी सात जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मॉलचे संचालक वाधवान पिता-पुत्रासह सनराइज रुग्णालयाच्या सर्वेसर्वा निकिता अमितसिंग व त्यांचे पती अमित सिंग त्रेहान आदींचा समावेश आहे.

ड्रीम्स मॉलमध्ये गुरुवारी रात्री लागलेल्या आगीत सनराइज रुग्णालयातील ९ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. फायर ब्रिगेडच्या जवानांनी उपचार घेत असलेल्या ७८ रुग्णांना बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले. या दुर्घटनेप्रकरणी शुक्रवारी रात्री भांडुप पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३०४, ३४ अन्वये मॉलचे संचालक राकेशकुमार कुलदीपसिंग वाधवान, सारंग राकेश वाधवान, दीपक शिर्के तसेच सनराइज प्रिव्हिलेज हेल्थ केअर सर्व्हिसेसचे संचालक अमितसिंग त्रेहान, निकिता अमितसिंग त्रेहान, स्विटी जैन आणि व्यवस्थापनातील इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला.

मॉलमध्ये १,१०८ दुकाने व गाळे असून त्यापैकी ४० टक्के सुरू आहेत. हा मॉल एचडीआयएल ड्रीम्स मॉल या कंपनीच्या मालकीचा आहे. त्यांच्यात व गाळेधारकांमध्ये वाद असल्याने नॅशनल लाॅ ट्रिब्युनलकडून २०१८ मध्ये ॲड. राहुल सहस्रबुद्धे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर निम्म्या भागात हाॅस्पिटल चालविण्यासाठी गेल्या वर्षी १ ऑक्टोबरपासून परवाना मिळाला.

जानेवारीपासून येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. त्याची मालकी निकिता त्रेहान यांच्याकडे असून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जॉर्ज पुतु शेरी हे काम पाहत आहेत. सुरक्षिततेबाबत हलगर्जी दाखविल्यानेच ९ जणांचा हाेरपळून मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :आगपोलिस