मुंबई : भांडूप येथील ताबा प्रमाणपत्र नसलेल्या इमारतीत कोविडच्या नावाखाली विशेष बाब म्हणून रुग्णालय सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर राजकीय दबाव आला होता, असा आरोप भाजपने केला आहे. ही परवानगी कशी दिली? दबाव कोणी आणला? याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे, तर वेळ आल्यास याप्रकरणी न्यायालयात दाद मागू, असा इशाराही भाजप नेत्यांनी दिला आहे.
या मॉलच्या काही भागाला ताबा प्रमाणपत्र मिळालेला नाही. तरीही कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कशी दिली? प्रशासनातील कोणते अधिकारी यासाठी जबाबदार आहेत. याबाबत चौकशी करण्याची मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी नियमांवर बोट ठेवून भांडूप विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त परवानगी देत नव्हते. यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जाता होता. मात्र ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने त्यांची बदली करण्यात आली, असा आरोप भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला.
स्थानिक नगरसेविकेच्या तक्रारीकडे दुर्लक्षविकास नियंत्रण नियमावलीप्रमाणे मॉलमध्ये वापरात बदल करून रुग्णालय सुरू करता येत नाही. अशावेळी हे रुग्णालय अनधिकृतच ठरते. आवश्यक कायदा नियम, अटी व शर्तीचे कुठलेही पालन न करता हे रुग्णालय उभारले होते. भाजपच्या स्थानिक नगरसेविका साक्षी साळवी यांनी वेळोवेळी या बेकायदा रुग्णालयाबाबत पालिकेकडे तक्रार केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्यामुळे या आगीत मृत्युमुखी पडलेल्या दहा रुग्णांच्या मृत्यूस ही विशेष परवानगी जबाबदार असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. शिवसेना जबाबदार; भाजपचा आरोपशिवसेनेच्या असंवेदनशीलतेमुळेच हे मृत्यू झाले. हे रुग्णालय सुरू करण्यासाठी काही वर्षांपासून परवानगी मागण्यात येत होती. मात्र, परवानगी दिली जात नसल्याने कोविड काळात विशेष बाब म्हणून ही परवानगी देण्यात आली. यासाठी वरिष्ठ पातळीवरून दबाव आल्याचा आरोप भालचंद्र शिरसाट यांनी केला.
माणुसकीची प्रचितीमॉलची आग विझविण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाचे जवान गुरुवारी रात्रीपासून कार्यरत हाेते. शुक्रवारची रात्र झाली तरी आग विझविण्याचे काम सुरूच होते. एवढ्या वेळ काम करणाऱ्या जवानांना पाणी, चहा आणि बिस्किटे देण्यासाठी लगतच्या परिसरातील रहिवासी सरसावले होते. आवश्यक मदत स्थानिकांकडून केली जात होती. काय हवे काय नको, याची आपुलकीने विचारपूस केली जात असल्याचे चित्र होते.
मॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते गुरुवारी रात्रीपासून शुक्रवारी रात्रीपर्यंत कार्यरत होते. त्यांना भर उन्हात काम करताना पाहून त्यांची तहान भागविण्यासाठी येथेच एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या शकील खान यांनी पाण्याचे तब्बल १५० बॉक्स वाटले.
मंदिराची मागील बाजू जळालीमॉलच्या मागील बाजूस एक मंदिर असून, या मंदिरालादेखील आगीची झळ बसल्याचे दुकानदारांनी सांगितले. मंदिराच्या मागील बाजूचे आगीत नुकसान झाल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले.