Join us

Hospital Fire: ‘ते’ दोघे ठरले देवदूत, ३० हून अधिक जणांचे वाचविले प्राण; त्याने आईला मिठी मारली अन...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 7:17 AM

भांडुप परिसरात राहणाऱ्या किरणने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास मॉलला आग लागल्याचे त्यांना समजले. किरण व राेहित तेथे पाेहाेचलाे तेव्हा गेट क्रमांक १ येथे अग्निशमन यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू हाेते.

मुंबई : धुरांचे लोट आणि त्यात अडकलेले रुग्ण यामुळे ड्रीम्स माॅलमधील परिस्थिती गंभीर झाली हाेती. मात्र, भांडुपच्या दोन तरुणांनी जिवाची पर्वा न करता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. ताे यशस्वीही झाला. रुग्णांंना मोबाइलची टॉर्च सुरू करायला सांगून अखेर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेच. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणाची माहिती देऊन त्यांच्या मदतीने या तरुणांनी रुग्णांचे बचावकार्य सुरू केले. रोहित सुर्वे आणि किरण गायचोर, अशी या धाडसी तरुणांची नावे असून, त्यांनी ३० हून अधिक रुग्णांंचे प्राण वाचविले.

भांडुप परिसरात राहणाऱ्या किरणने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास मॉलला आग लागल्याचे त्यांना समजले. किरण व राेहित तेथे पाेहाेचलाे तेव्हा गेट क्रमांक १ येथे अग्निशमन यंत्रणेकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू हाेते. त्यांनी गेट क्रमांक ३ कडे धाव घेतली. तेथे सनराइज हॉस्पिटलचे काही पदाधिकारी हाेते. त्यांच्याकडून ७६ रुग्ण आत अडकल्याची माहिती मिळाली. हे ऐकताच जिवाची पर्वा न करता दोघांनी आत प्रवेश केला. धुरामुळे सर्वत्र काळोख पसरला होता. अंधारात चाचपडत कसेबसे ते पहिल्या मजल्यापर्यंत पाेहाेचले. मात्र, चोहोबाजूने पसरलेला अंधार आणि त्यातच धुरामुळे श्वास कोंडू लागला. त्यामुळे ते खाली आले. मात्र, आत अडकलेल्या रुग्णांचे काय झाले असेल, या काळजीने ते अस्वस्थ झाले आणि धाडस करून पुन्हा आत गेले. त्यांनी रुग्णांना बाहेरूनच आवाज देऊन मोबाइलची टॉर्च सुरू करायला सांगितले. याच प्रकाशात ते रुग्णांपर्यंत पाेहाेचले. अग्निशमन दलाच्या मदतीने रुग्णांना खाली आणून त्यांना अन्य रुग्णालयात दाखल केले.

याचवेळी स्वामी समर्थ मठ आणि पंचमुखी सेवा संस्थांच्या रुग्णवाहिकाही तेथे दाखल झाल्या. त्यातून रुग्णांंना शक्य तसे जवळच्या कोविड सेंटर, तसेच पालिका, सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सर्वांना सुखरूप खाली आणायचे हाेते

सर्वांना सुखरूप खाली आणायचे, हेच डोक्यात होते. त्यासाठी फक्त प्रयत्न केले, असे रोहित सुर्वे याने सांगितले.

कोविड रुग्णाचा पळ

कोविड रुग्णाला रिक्षातून अन्य कोविड सेंटरमध्ये नेत असताना एकाने मध्येच उतरून घरी जात असल्याचे सांगितले. काहीही करून ताे ऐकायला तयार नव्हता. त्याचा त्रास इतर रुग्णांना हाेऊ लागला. अखेर त्याचे फोटो काढून व नंबर घेऊन त्याला सोडण्यात आले, असे किरण गायचाेर याने सांगितले. मात्र, अशाच प्रकारे काही रुग्ण भीतीने पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोविडचे रुग्ण असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही वर्तविण्यात येत आहे.

त्याने आईला मिठी मारली अन् लाखमाेलाचे समाधान मिळाले

भांडुपमधील एक दाम्पत्य काही दिवसांपूर्वी येथे दाखल झाले होते. यातील पतीचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांची पत्नी तेथेच होती. आग व धुरामुळे त्याही अडकल्या. राेहित व किरणने त्यांनाही सुखरूप बाहेर काढले. यावेळी त्यांच्या मुलाने आई वाचल्याचे सांगत, मारलेल्या मिठीतच खूप काही कमावल्यासारखे वाटले, लाखमाेलाचे समाधान मिळाले, असे किरणने सांगितले.

टॅग्स :आग