मुंबई- ह्रदयाची शस्त्रक्रिया 200 टक्के सुरक्षित असल्याची हमी देऊन तसंच त्या शस्त्रक्रियेवर 43 लाख रूपये खर्च करूनही एका महिलेचा मृत्यू झाला. ठाण्यातील एका महिलेचा हृदयातील झडपेच्या ऑपरेशनसाठी 43 लाख रुपये खर्च करूनही दुर्देवी मृत्यू झाला आहे. ऑपरेशनची प्रक्रिया २०० टक्के सुरक्षित असताना आणि ऑपरेशननंतर अवघ्या पाच दिवसात रुग्णाला घरी सोडण्याचं आश्वासन हिंदुजा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिल्यानंतरही या महिलेचा मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे.
ठाण्यात राहणारे मिठूलाल बाफना यांनी त्यांची पत्नी मंजू यांना हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. ट्रान्सकॅथर मायट्रल वॉल्व रिपेअर करण्याची नवीन प्रक्रिया २०० टक्के सुरक्षित आहे, असं हिंदुजा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी बाफना यांना सांगितलं होतं. सुरुवातीला त्यांना या ऑपरेशनसाठी 20 लाख रुपये खर्च होणार असल्याचं तसंच 5 दिवसात रुग्णाला घरी सोडण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण 60 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून आणि 43 लाख रुपये खर्च करूनही त्यांची पत्नी वाचू शकली नाही. 60 दिवसानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला तेव्हाही त्या कोमात होत्या. रुग्णवाहिकेत बसल्यावर काही मिनिटातच त्यांचा मृत्यू झाल्याचं मिठूलाल बाफना यांनी महाराष्ट्र मेडिकल काऊंन्सिलला दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
पत्नीच्या उपचारावर बाफना यांनी 43 लाख रुपये खर्च केले. त्यातील काही रक्कम त्यांना परत मिळाली आहे. हिंदुजा हॉस्पिटलने 12 लाख 47 हजार रुपये त्यांना परत दिले असून जीवन विमामधून 11 लाख रुपये त्यांना परत मिळाले. 'सुरुवातीला आम्हाला 20 लाख रुपये खर्च येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर खर्च दुप्पट वाढला. रुग्णाची तब्येत ठणठणीत होती. त्या रोज एक किलोमीटर चालायच्या,' असं या मृत महिलेच्या जावयाने सांगितलं.
दरम्यान, उपचारात कोणतीही चूक झाली नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं. मंजू यांचं सहा वर्षापूर्वीही ऑपरेशन करण्यात आलं होतं. डॉक्टर कौशल पांडेय यांनी त्यांचं ऑपरेशन केलं होतं. आम्ही केवळ हृदयाच्या झडपांचं ऑपरेशन केलं होतं. ६ वर्षापूर्वी त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. त्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. रिस्क असल्यामुळे त्यांची दुसरी ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली नाही, असं त्यांनी सांगितलं.