रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन

By सीमा महांगडे | Published: December 30, 2023 06:40 PM2023-12-30T18:40:00+5:302023-12-30T18:41:21+5:30

रुग्णालयात ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Hospital plastic bottles will be recycled Plastic Bottle Crusher Machine at Shiv Hospital | रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन

रुग्णालयातील प्लास्टिक बाटल्याचा पुनर्वापर होणार; शीव रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशर मशीन

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा पॅक बंद असणाऱ्या व सहजपणे उपलब्ध असणाऱ्या प्लास्टिक बाटल्यांचा वापर करतात. बाटलीतले पाणी संपल्यानंतर त्या बाटल्या कचऱ्यामध्ये जातात. मात्र या बाटल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारांमुळे कचऱ्यामध्ये मोठी जागा या बाटल्यांनी व्यापलेली असते. तसेच यामुळे कचऱ्याचे विलगीकरण करणे देखील तुलनेने कठीण होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शीव (सायन ) येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन
सुरु करण्यात आली आहे.

रुग्णालयात ठीक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र अनेकदा रुग्ण व त्यांच्यासोबत असलेली आप्त मंडळी ही बाटलीबंद पाणी पिण्यास प्राधान्य देतात. यामुळे रुग्णालयातील एकंदरीत कचऱ्यामध्ये या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचे प्रमाण लक्षणीय असते. या बाटल्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्या कचऱ्यामध्ये मोठी जागा व्यापतात. हे टाळण्यासाठी आणि अधिक चांगले कचरा व्यवस्थापन साध्य करण्यासाठी रुग्णालयामध्ये प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन नुकतेच कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे. रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्यांद्वारे दररोज गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यामधील प्लास्टिक बाटल्या आता वेगळ्या करण्यात येत असून यामध्ये पिण्याच्या पाण्यासोबतच शीतपेया सारख्या अन्य प्लास्टिक बाटल्यांचाही समावेश समावेश असणार आहे.
 
पर्यावरणपूरक मशीन
लोकमान्य टिळक रुग्णालयात नुकतेच प्लास्टिक बॉटल क्रशिंग मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. वापरलेली पाण्याची रिकामी बाटली या यंत्रामध्ये टाकताच तिचा अक्षरशः चिमूटभर भुगा होणार आहे. ज्यामुळे एकंदरीत कचऱ्यामधली बाटल्यांची संख्या कमी झाल्याने त्या कचऱ्याचे विलगीकरण व व्यवस्थापन करणे अधिक सुलभ होणार आहे. त्याचबरोबर प्लास्टिकच्या बाटल्यांचा मशीनद्वारे करण्यात आलेल्या भुग्याचा वापर हा पुनर्चक्रीकरणासाठी होणार असल्याने ते पर्यावरण पूरक देखील ठरणार आहे. अधिक कार्यक्षम कचरा पुनर्वापरात योगदान देण्यास आणि प्लास्टिक कचऱ्याचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठीही हे यंत्र प्रभावी ठरणार आहे. भुगा केलेल्या कच-याचा पुनर्वापर करून त्यापासून फॅब्रिक्स, टोप्या, शूज, फोम, रिफ्लेक्टर जॅकेट, मोल्डेड फर्निचर आदी तयार करणेही शक्य होणार आहे, अशीही माहिती या निमित्ताने डॉ. मोहन जोशी यांनी दिली आहे.

Web Title: Hospital plastic bottles will be recycled Plastic Bottle Crusher Machine at Shiv Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.