मृत महिलेच्या सोन्याच्या बांगड्या केल्या लंपास; वॉर्डबॉयला झाली अटक
By धीरज परब | Published: March 5, 2023 01:46 PM2023-03-05T13:46:23+5:302023-03-05T13:46:53+5:30
मीरारोड मधील एका वृद्धेला रुग्णवाहिकेतून नेताना तिच्या हातातील २ सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या फॅमेली केअर रुग्णालयाच्या वॉर्डबॉयला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .
धीरज परब
मीरारोड - मीरारोड मधील एका वृद्धेला रुग्णवाहिकेतून नेताना तिच्या हातातील २ सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या फॅमेली केअर रुग्णालयाच्या वॉर्डबॉयला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलिसांनी विरारच्या सराफा कडून त्या बांगड्या हस्तगत केल्या आहेत .
मीरारोडच्या कनकीया भागात राहणाऱ्या रहीम शेख यांची ८५ वर्षीय आई झहूरबी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने इमारतीत राहणाऱ्या डॉक्टर सिद्धीकी यांना बोलावले होते . त्यांनी फॅमेली केअर रुग्णालयात दाखल करा सांगितले व रुग्णालयाची रुग्णवाहिका बोलावली . रुग्णवाहिकेत झहूरबी यांना ठेवले असता रुग्णालयाचा वॉर्डबॉय सागर तेजम (२५) रा. मानवेलपाडा , विरार ह्याने रहीम यांना पुढे चालका सोबत बसा सांगितले . रुग्णवाहिका रुग्णालयात आली असता डॉक्टर आले व त्यांनी झहूरबी यांना तपासून त्यांचे निधन झालेले असल्याचे सांगितले . त्यावेळी सागर मात्र निघून गेला होता .
त्याच रुग्णवाहिकेने मयत झहूरबी यांना घरी आणले . रहीम यांची मुलगी रुबिना हिने आजीच्या हातातील सोन्याच्या बांगड्या नसल्या बद्दल विचारणा केली . रहीम यांनी रुग्णालयाच्या चालकास कॉल करून सागर बाबत विचारणा केली असता त्याने माहिती नसल्याचे सांगितले .
या प्रकरणी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सहायक निरीक्षक योगेश काळे यांनी तपास सुरु केला . सागर याची पोलिसांनी चौकशी सुरु केल्या नंतर अखेर त्याने २ सोन्याच्या बांगड्या मृत झहूरबी यांच्या हातातून रुग्णवाहिकेत काढून घेतल्या असल्याची कबुली दिली . त्या बांगड्या त्याने विरारच्या एका सराफा कडे दिल्या होत्या . पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत . सागर हा न्यायालयीन कोठडीत असून गावी घर बांधण्यासाठ पैसे नसल्याने त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले .