Join us

परळ, माटुंगा, भायखळा, दादरमध्ये रुग्णवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या दोनशेवर आली होती. काही दिवसांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार नियंत्रणात आल्यानंतर बाधित रुग्णांची संख्या दोनशेवर आली होती. काही दिवसांपासून मुंबईत पुन्हा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३५६१ एवढी आहे. परळ, माटुंगा, भायखळा, नागपाडा, दादर, कुलाबा या भागांमध्ये रुग्णवाढ दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यानंतर मुंबईत दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाला. मार्च-एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊन दररोज नऊ ते दहा हजार रुग्ण आढळत होते. प्रतिबंधक उपाययोजना आणि कडक निर्बंधांनंतर अखेर कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आला. ऑगस्ट महिन्यापासून दररोजची रुग्णसंख्या दोनशे ते अडीशेवर आली होती. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ झाली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सध्या मुंबईतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०५ टक्के आहे, तर परळ-लालबाग, सायन-माटुंगा या भागांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर ०.०८ टक्के आहे, तर भायखळा-नागपाडा, दादर-माहीम, कुलाबा या भागांमध्ये ०.०७ टक्के आहे.

अशा सुरू आहेत उपाययोजना...

* कोविड रुग्णांसाठी खाटा वाढविणे, औषध - इंजेक्शनचा साठा ठेवणे, पुरेसा ऑक्सिजन पुरवठा ठेवणे.

* पाचपेक्षा अधिक बाधित रुग्ण असलेल्या सील इमारतींच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल.

* विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

* कोरोनाच्या प्रसारास झोपडपट्टी व चाळीतील सार्वजनिक शौचालय कारणीभूत ठरतात. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सार्वजनिक शौचालयांचे दररोज पाच वेळा निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे.

या विभागात रुग्णवाढ

विभाग....दैनंदिन रुग्णवाढ

एफ दक्षिण - परळ....०.०८

एफ उत्तर..माटुंगा - सायन...०.०८

ई भायखळा - ०.०७

जी उत्तर - माहीम - दादर - ०.०७

ए - कुलाबा - ०.०७

सर्वाधिक सक्रिय रुग्ण

के पश्चिम.. अंधेरी प. - २३६

आर दक्षिण ...कांदिवली - २२०

आर उत्तर ....दहिसर...२०५

जी उत्तर ..दादर - माहीम - २०५

एच पश्चिम - वांद्रे प. - २०४