Join us

रुग्णालये ‘लाक्षागृहे’ बनू शकत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:08 AM

मुंब्रा रुग्णालय आगीची उच्च न्यायालयाकडून दखल; सर्व नर्सिंग होम्स, कोविड सेंटर्सचे तत्काळ फायर ऑडिट करालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई ...

मुंब्रा रुग्णालय आगीची उच्च न्यायालयाकडून दखल; सर्व नर्सिंग होम्स, कोविड सेंटर्सचे तत्काळ फायर ऑडिट करा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रुग्णालयांना आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. लोक जीव वाचविण्यासाठी रुग्णालयात येतात आणि तिथेच त्यांचा जीव जाताे. रुग्णालये ‘लाक्षागृहे’ बनू शकत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व महापालिकांना त्यांच्या हद्दीतील सर्व नर्सिंग होम्स व कोविड सेंटर्सचे तत्काळ फायर ऑडिट करण्याचे आदेश द्या, असे आदेश राज्य सरकारला दिले.

दोन दिवसांपूर्वी मुंब्रा येथील रुग्णालयाला आग लागून चार लोकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दखल घेतली. याआधी भांडुप, वसई-विरार, नाशिक आणि आता ठाणे या ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत, असे न्यायालयाने म्हटले. त्यावर मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी म्हटले की, आम्ही यामध्ये लक्ष घातले आहे. २४ प्रभागांमध्ये २४ पथके नेमली आहेत. नाशिकच्या ऑक्सिजन गळतीप्रकरणातून धडा घेत पालिका त्या दृष्टीने पावले उचलत आहे.

* कठीण काळ, सर्वांचीच परीक्षा सुरू आहे!

सर्व रुग्णालयांत फायर ऑडिट करण्यास सुरुवात करा. ते (कोरोना रुग्ण) चिंतित होऊन रुग्णालयात जातात, त्यांना असा त्रास व्हायला नको. हा कठीण काळ आहे आणि सर्वांचीच परीक्षा सुरू आहे, हे आम्हालाही समजत आहे. आम्हाला आमचे काम बाजूला सारून सर्व मूलभूत बाबींचे पालन केले जात आहे की नाही, हे पाहावे लागत आहे, असे न्यायालयाने नमूद केले.

--------------------------------------