शेफाली परब-पंडित
मुंबई : गेल्या तीन वर्षांत मुंबई अग्निशमन दलाने २५ रुग्णालये आणि २०४ सरकारी दवाखान्यांची झाडाझडती घेतली आहे. यापैकी आग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करणारी नऊ रुग्णालये आणि २०४ दवाखान्यांना नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र केवळ चार रुग्णालयांनी सुरक्षेसाठी आवश्यक बदल केले असून उर्वरित रुग्णालय, दवाखान्यांनी अग्निशमन दलाच्या नोटीसला केराची टोपली दाखवली. अशा रुग्णालयांचा बेजबाबदारपणा निष्पाप रुग्णांच्या जीवावर बेतू शकतो, हे कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीने दाखवून दिले आहे.
२०११ मध्ये कोलकाता येथील एका रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर अग्निशमन दलाने मुंबईतील ६७ मोठ्या रुग्णालयांचे (शंभरहून अधिक खाटा) फायर आॅडिट केले होते. यामध्ये मुंबईतील बहुतांशी मोठ्या रुग्णालयांमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून आगीशी खेळ सुरू असल्याचे उघड झाले होते. या सर्व रुग्णालयांना नोटीस पाठवल्यानंतर एक रुग्णालय वगळता सर्व रुग्णालयांनी आग प्रतिबंधक नियमांनुसार आवश्यक बदल केले होते.अग्निशमन दलातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये महापालिकेची पाच मोठी रुग्णालये आणि २०४ दवाखान्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र खासगी रुग्णायांमध्ये कोणतीही तपासणी करण्यात आलेली नाही, असे समजते. मुंबईतील उत्तुंग इमारती, रुग्णालयांची संख्या पाहता सर्व ठिकाणी तपासणी करणे शक्य नाही. आग प्रतिबंधक आणि जीव सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व रुग्णालयांना दर सहा महिन्यांनी फायर आॅडिट करणे सक्तीचे असल्याचे अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने सांगितले.गेल्या पाच वर्षांत अग्निशमन दलाला रुग्णालयातील आगीशी संबंधित ६० कॉल आले. यामध्ये रुग्णालय, दवाखाने आणि प्रसूतिगृहांचाही समावेश आहे.असा सुरू आहे जीवघेणा खेळमुंबईतील बहुतांशी रुग्णालयांमध्ये अग्निरोधक यंत्रणा कार्यान्वित नाही, फायर एक्सटिंग्विशरसारख्या अनेक गोष्टीत नाहीत, आपत्तीकाळात बाहेर पडण्याच्या मार्गात अडथळे आहेत, अशा पद्धतीने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.प्रशिक्षण देण्याची जबाबदारी रुग्णालयाचीआगीच्या दुर्घटनेत बचावाचे प्रशिक्षण दरवर्षी आपल्या कर्मचाºयांना देण्याची जबाबदारी रुग्णालयांची आहे. मात्र या नियमाचे अपवादाने पालन होताना दिसते. कायद्यात याबाबत तरतूद नसल्याने रुग्णालयांना तशी सक्तीही करता येत नाही. रुग्णालय व्यवस्थापनाने संपर्क केल्यास आपत्कालीन प्रशिक्षण देण्याची आमची तयारी असते, असे अग्निशमन दलातील सूत्रांनी सांगितले.