Join us  

दहीहंडी उत्सवासाठी रुग्णालये 'अलर्ट मोडवर', १२५ हून अधिक रुग्णवाहिका सज्ज

By संतोष आंधळे | Published: September 06, 2023 7:58 PM

 शहरात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात.

मुंबई :  शहरात दरवर्षी दहिहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दहीहंडीच्या कार्यक्रमात गोविंदा जखमी होण्याचे प्रकार घडू शकतात, ही संभाव्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील सर्व रुग्णलयातील १२५ पेक्षा अधिक रुग्णवाहिका आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.याकरिता महापालिकेने ३ पाळ्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-यांची यांची नियुक्ती केली आहे.

 मुंबई शहर भागासह पूर्व व पश्चिम उपनगरांत हा दिवस ऐतिहासिक ठरावा, यासाठी विविध गोविंदा पथक आणि संबंधित यंत्रणा अथक प्रयत्न करीत असतात. दहीहंडीच्या दिवशी काही वेळा दुखापती होण्याची शक्यता असते. त्यावेळी तात्काळ रुग्णालयात वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून महानगलिकेने विशेष नियोजन केले आहे. महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयात १०, परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (के. ई. एम.) रुग्णालयात ०७ रुग्णवाहिका  आणि मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात ४ रुग्णवाहिका  आणि विशेष उपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तसेच १६ उपनगरीय रूग्णालयातही १०५ रुग्णवाहिका  सज्ज ठेवण्यात आले आहेत. या रुग्णालयांमध्ये प्रत्येकी ५ ते १० खाटांची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे. या व्यवस्थे अंतर्गत निर्धारित पद्धतीनुसार किरकोळ जखमी झालेल्या गोविंदांवर प्रथमोपचार करुन त्यांना घरी सोडण्यात येते. तर, गंभीर जखमी आणि दीर्घकाल उपचारांची आवश्यकता असलेल्या गोविंदांसाठीही उपचार सुविधा देण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये सर्व औषधे, इंजेक्शन आणि सर्जीकल मटेरिअल, पीओपी तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच एक्स रे व इतर मशीनही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सर्व रूग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांनी या काळात दक्ष रहावे, अशा सूचनाही महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांना व आरोग्य यंत्रणेला प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :दहीहंडीमुंबईहॉस्पिटल