Join us  

रुग्णालयांत सुरक्षारक्षक ‘आॅन ड्युटी’

By admin | Published: April 02, 2017 1:52 AM

डॉक्टरांच्या राज्यव्यापी पाच दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुरक्षाविषयक दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे

मुंबई : डॉक्टरांच्या राज्यव्यापी पाच दिवसीय संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सुरक्षाविषयक दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शनिवारी मुंबईसह राज्यभरातील रुग्णालयांत पहिल्या टप्प्यातील सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले; त्याचप्रमाणे, रुग्णासोबत प्रवेशपासासह दोनच नातेवाइकांना प्रवेश देण्यात येत असल्याचे रुग्णालयांत दिसून आले. राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या रुग्णालयांत पहिल्या टप्प्यात ५८४ सुरक्षारक्षक तर मुंबईतील पालिका रुग्णालयांत ४०० सुरक्षारक्षक दाखल झाले आहेत.धुळे येथील डॉ. रोहन म्हामुणकर या निवासी डॉक्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरात डॉक्टरांवरील हल्ल्यांचे सत्र सुरू होते. त्याच्या निषेधार्थ राज्यभरातील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांसह इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ४० हजार डॉक्टरांनी संप केला होता. या वेळी सुरक्षाविषयक मागणीबद्दल आग्रही असलेल्या डॉक्टरांनी तब्बल पाच दिवस रुग्णसेवा वेठीस धरली होती. त्यानंतर शासकीय आणि विविध पातळ्यांवर बैठका पार पडल्या. अखेर, ३० एप्रिलपर्यंत राज्यभरात १ हजार १०० सुरक्षारक्षक नेमण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे.१ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील सुरक्षारक्षक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. त्याची पूर्तता करत मुंबईतील शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांत २६३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या केईएम, नायर, शीव आणि कूपर रुग्णालयांत ४०० सुरक्षारक्षक दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)केईएम रुग्णालयात पहिल्या टप्प्यात तीन पाळ्यांत काम करण्यासाठी ६८ सुरक्षारक्षक दाखल झाले आहेत. शिवाय, रुग्णालयात संवेदनशील भागात अलार्म सिस्टीमही एका आठवड्यापूर्वी सुरू करण्यात आली आहे. तसेच, प्रवेशपाससहित रुग्णांना प्रवेश देण्याकडेही सुरक्षारक्षकांचे विशेष लक्ष आहे, त्यामुळे आता शासकीय पातळीवर मिळालेल्या आश्वासनांची पूर्तता होतेय, असा विश्वास आहे.- डॉ. ए.के. ग्वालानी, अतिरिक्त अधिष्ठाता, केईएम रुग्णालय