कोरोनामुक्त झाल्यानंतरही रुग्णालयांचा रुग्णांवर ‘वॉच’
पालिका प्रशासन; म्युकरमायकोसिसचा धोका बळावत असल्याने खबरदारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अतिजोखमीच्या गटातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर आता उपचारानंतरही रुग्णालयांनी वॉच ठेवावा, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. ऑक्सिजनवर असणाऱ्या किंवा मधुमेह असणाऱ्या रुग्णांना कोरोनामुक्तीनंतर म्युकरमायकोसिसचा धोका बळावत असल्याने महापालिकेच्या रुग्णालयांना , कोविड केंद्रांना रुग्णांचा फाॅलोअप घेण्यास सांगितले आहे.
म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन झाल्यानंतर अंधत्व, अवयव निकामी होणे, पेशींचे नुकसान होण्याचा धोका असतो. परिणामी, हा आजार वेळीच निदान व उपचार प्रक्रियेत असावा लागतो. नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, रुग्णालयातून बरे होऊन घरी जाण्यापूर्वी रुग्णांना मधुमेहाची चाचणी करावी लागते. यातून शरीरातील रक्ताची पातळी किती आहे, हे समजते. तसेच, बरे झाल्यानंतर रुग्णांना डोकेदुखी, नाकातून काळ्या रंगाचा स्त्राव येणे अशा स्वरुपाची लक्षणे जाणवतात. त्याविषयीही वेळोवेळी डॉक्टरांकडून रुग्णांची चौकशी करण्यात येते.
ऑक्सिजन उपचारपद्धतीने निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा वापर न होणे हे काळ्या बुरशीच्या संसर्गाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे कोरोनामुक्तीनंतरही बराच काळ या रुग्णांना काळजी घ्यावी लागते. तसेच, हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांना काळ्या बुरशीच्या संसर्गाचा त्रास होऊ शकतो. मागील लाटेच्या तुलनेत यंदाच्या लाटेत म्युकरमायकोसिसचा त्रास वाढू लागला आहे. आतापर्यंत २२५ हून अधिक रुग्ण आढळले असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे.
असोसिएशन आफ ऑटोलॅऱिंगोलाॅजिस्टचे अध्यक्ष डॉ. अजय डोईफोडे यांनी सांगितले की, स्टेराॅईडच्या वापरामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. परिणामी, म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले आहे.
.......................................................