रुग्णालये होणार हायटेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2016 02:01 AM2016-04-10T02:01:08+5:302016-04-10T02:01:08+5:30
राज्यातील विविध भागांतून मुंबई महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांत रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. प्रत्येकवेळी केस पेपर, तपासणी अहवालांची फाईल घेऊन फिरणे रुग्णांना त्रासदायक
- पूजा दामले, मुंबई
राज्यातील विविध भागांतून मुंबई महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयांत रुग्णांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो. प्रत्येकवेळी केस पेपर, तपासणी अहवालांची फाईल घेऊन फिरणे रुग्णांना त्रासदायक होते. पुढच्या काळात रुग्णांचा हा त्रास कमी होणार आहे. कारण, महापालिकेची प्रमुख तीन रुग्णालये हायटेक होणार असून, रुग्णालयांत ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’ सुरू करण्यात येणार आहे.
मुंबईतील नायर, केईएम आणि सायन या तीन प्रमुख रुग्णालयांत पुढच्या दोन वर्षांत बदल होणार आहेत. यातील प्रमुख बदल म्हणजे रुग्णालयांत कागदांचा वापर कमी केला जाणार आहे.
रुग्णांचा त्रास वाचणार; फक्त एक पावती सांभाळावी लागेल
सद्यपरिस्थितीत एखादा रुग्ण पालिका रुग्णालयात उपचारासाठी गेल्यावर त्याचा केस पेपर काढला जातो. त्यानंतर रुग्णाला कराव्या लागणाऱ्या तपासण्या, त्याचे अहवाल अशा कागदपत्रांची मोठी फाईल तयार होते. ही फाईल प्रत्येक वेळेस रुग्णाकडे असणे आवश्यक असते. अनेकदा आधीचे काही अहवाल गहाळ झालेले असतात. अशावेळी डॉक्टरांनाही तपासणी करताना अनेक अडचणी येतात.
रुग्णांचे रेकॉर्ड व्यवस्थित राहण्यासाठी आॅनलाइन कार्यपद्धत सुरू करण्यात येणार आहे. सध्या काही प्रमाणात रुग्णालयातील कामकाज कॉम्प्युटरवर केले जाते. भविष्यात केस पेपरपासून सर्वच काम कॉम्प्युटरवर होणार आहे. केस पेपर काढल्यावर रुग्णाकडे एक पावती दिली जाणार आहे. केवळ ही पावतीच रुग्णाला सांभाळून ठेवायला लागणार आहे. कारण, या पावतीच्या आधारे रुग्ण डॉक्टरांना भेटू शकतील.
किमान दोन वर्षे लागतील... सध्या रुग्णालयातील काही काम कॉम्प्युटरवर होते. पण, ‘हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम’मुळे रुग्णालयाचे सर्वच काम आॅनलाइन होणार आहे. याचा रुग्णांना आणि डॉक्टरांनाही फायदा होणार आहे. यासंबंधी सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही सिस्टिम सुरू करण्यासाठी किमान दोन वर्षांचा कालावधी लागेल. सिस्टिम वापरण्याचे प्रशिक्षण डॉक्टर, परिचारिका आणि पॅरावैद्यक कर्मचाऱ्यांना आधी दिले जाईल. त्यानंतरच ही सिस्टिम सुरू करण्यात येईल, असे महापालिका प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.