मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 03:42 PM2023-06-26T15:42:51+5:302023-06-26T15:43:42+5:30

छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणातून सामजिक उन्नती साधण्यावर भर दिला होता

Hostels for backward class students open in Mumbai, name announced by Chief Minister Eknath Shinde in Chembur | मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा

मुंबईत मागासवर्गीय विद्यार्थींनींसाठी वसतीगृह सुरू, मुख्यमंत्र्यांकडून नावाचीही घोषणा

googlenewsNext

मुंबई - राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने चेंबूर येथे मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी उभारलेल्या शासकीय वसतीगृहाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. २५० विद्यार्थिनी क्षमता असलेल्या या वसतीगृहाच्या नवीन इमारतीची मुख्यमंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. तसेच, चेंबूर परिसरातील विविध कारणांमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील, असेही यासमयी बोलताना आश्वस्त केले. तर, आज उद्घाटन झालेल्या या वसतिगृहाला 'माता रमाई' यांचे नाव देण्याची घोषणाही याप्रसंगी केली.

छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणातून सामजिक उन्नती साधण्यावर भर दिला होता.आज आपण त्याच दिशेने मार्गक्रमण करत आहोत, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी रयतेचे पालक म्हणून काम केले. बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न आहे. शासनाच्या सर्व संबंधित विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी अनेक योजना कार्यान्वित करण्यात आल्या असल्याचे यावेळी नमूद केले.   

याप्रसंगी महिला व बाल विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे,  सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे  उपस्थित होते.

मंगरूळपीर (जि. वाशिम)  येथे मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या शासकीय वसतीगृहाचे आणि ‘बार्टी’ अंतर्गत पुण्याच्या येरवडा संकुलात यूपीएससीच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. तर, समान संधी केंद्र उपक्रमाच्या मोबाईल ॲपचे अनावरणही यावेळी करण्यात आले. मुंबईतील एसआरएसारख्या रखडलेल्या प्रकल्पामुळे नागरिक मुंबईबाहेर फेकले गेले आहेत. सरकारच्या माध्यमातून संबंधित संस्थांना सोबत घेऊन मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. 
 

Web Title: Hostels for backward class students open in Mumbai, name announced by Chief Minister Eknath Shinde in Chembur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.